नागपूर | Nagpur
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मागील काही दिवसांपासून काँग्रेससह विविध पक्षांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान आता ‘रेजीम चेंज’ (सत्ता बदल) विषयीची चर्चा जोर धरू लागली असून, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंना लगावला टोला
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘रेजीम चेंज’च्या विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः शिवसेनेत ‘रेजीम चेंज’ रोखू शकले नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या रेजीम चेंजबद्दल बोलताहेत मला माहीत नाही. जेव्हा त्यांच्या पक्षाने हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, तेव्हा अशी परिस्थिती आली की, ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचं होतं, त्यांनी खरी शिवसेना बनवली, असे त्यांनी म्हटले.
मोदी सरकार पुन्हा निवडून येईल
तसेच सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, मी स्पष्टपणे सांगितले आहे की, संविधानाशी लढणे बंद करा. इथे निर्णय संसदेत होतील, संविधानाने होईल, रस्त्यावर निर्णय होणार नाही. लोकशाहीत निर्णय निवडणुकीने होईल. मोदी सरकार आहे, पुन्हा निवडून येईल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रशांत भूषण यांच्या विधानावरही सोशल मीडियातून पलटवार
यापूर्वी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे ‘आम्हाला सत्ता बदल हवाय’ असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झाले आहे. अखेर हे सर्वकाही सत्ता बदलासाठी आहे. शेवटी मनात होते ते ओठांवर आलेच”, असे म्हटले होते. दिल्लीतील आंदोलने आणि विरोधी पक्षांच्या ‘रेजीम चेंज’च्या भूमिकेमुळे सध्या देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना तीव्र वेग आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.




