पुणे | प्रतिनिधी | Pune
पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार (Hanumant Pawar) यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा हल्ला भाजपचे (BJP) कार्यकर्ते तुषार दामगुडे याने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडेला अटक (Arrested) करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत या घटनेचा निषेध केला आहे. यानंतर आता चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुण्यात सोमवारी एका न्यूज चॅनेलकडून ‘शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे (Tushar Damgude) यांच्यात कार्यालयाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. तुषार दामगुडे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही पॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये दामगुडे यांनीच सुऊवातीला हात उगारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करून बोलावले आणि तू भाजप-संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांची बाजू का घेतो, असा जाब विचारला. तुषार दामगुडे यांनी मला पिस्तुल दाखवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले, असे सांगितले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
वैचारिक विरोधच हल्ल्यास कारणीभूत?
काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलेल्या शिवीगाळीचा हनुमंत पवार यांनी तीव्र विरोध केला होता. याच जुन्या वादाचा राग धरून दामगुडे यांनी सोमवारी पवार यांना ‘तू हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेणारा कोण?’ असा जाब विचारत त्यांच्यावर हा हल्ला केला. पवार यांच्या दाव्यानुसार, मागील चर्चेतील ती शाब्दिक चकमकच या मारहाणीमागचे प्रमुख कारण ठरली असून, वैचारिक विरोधाचे रूपांतर अशा प्रकारे शारीरिक हिंसाचारात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला तुरुंगात टाकावे – हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचे राज्य फोफावू पाहत आहे. महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये. हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
दामगुडे यांनी हा हल्ला पूर्वनियोजित केला आहे. वार्तालाप संपताच त्यांनी कार्यालयाबाहेर आधीच लोकांना बोलावून ठेवले होते. मी फोनवर बोलत बाहेर पडत असताना ‘तुला जिवंत राहायचे आहे ना? हे बघ पिस्तूल’ असे म्हणत धमकावले. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली.
हनुमंत पवार, प्रवक्ते, राष्ट्रीय काँग्रेस
यापूर्वी एका अन्य खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पवार यांनी मला शिवीगाळ केली होती. आईवरून शिवीगाळ केल्याने मी संतापलो होतो. मला नक्षलवाद्यांकडून धोका असल्याने मी परवानाधारक पिस्तुल बाळगतो. पवार यांनी मला नक्षलवाद्यांविरोधातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही प्रकार केला.
तुषार दामगुडे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते





