मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी आज ॲड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची एकमुखाने फेरनिवड झाली. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “तुम्ही पुन्हा येईल म्हणाले नाहीत, तरी आलात…”; देवेंद्र फडणवीसांकडून भाषणावेळी चिमटे
यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की,”विधानसभेच्या अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड झाल्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करतो.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले. त्यांचेही पुन्हा अभिनंदन, त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. मात्र,अध्यक्ष महोदय म्हणाले नव्हते की मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. तसेच मी म्हटले होते २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले नाही तर शेती करायला जाईन. मात्र, २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले, सोबत अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे. त्यानुसार आता आम्ही २३७ आमदार आहोत, त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झाले आहे. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असे व्हायला नको होते. विरोधी पक्षांच्या अध्यक्षपदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा असून ते अभ्यास करुन निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Winter : नाशिककरांना हुडहुडी! निफाडचे ६.७, तर नाशिकचे तापमान ९.४ अंशांवर
तसेच “राहुल नार्वेकर साताऱ्याचे (Satara) जावई आहेत, सातारा माझे गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. अनेक ज्येष्ठ वकिल इकडे यायचे. सर्व कायद्याचा किस पाडायचे, अशा परिस्थितीत अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. संयम ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आपण दिलेला निर्णय योग्यच होता. कारण जनतेनेही तोच न्याय दिला”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात एक शायरी देखील ऐकून दाखवली. “कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर “, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. या शायरीनंतर रामदास आठवले आणि माझी आता युती झाली आहे, असे मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : अजितदादांचा जयंत पाटलांना टोला; म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम झालाय…”
तर विरोधकांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सभागृहातून गेले, पण नाना पटोले वाचले. ईव्हिएम घोटाळा असता तर तुम्ही इथे नसतात असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंना टोला मारला. नाना पटोलेंचे मी आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं. तिथून गाडी सुरू झाली. त्यामुळे सगळं क्रेडीट तुम्हालाच आहे, ते खरं आम्ही मानतो, त्यामुळे नाना आमचे खरे मित्र. माध्यमांसमोर ते काहीही बोलत असले तरी, ते आमचेच आहे” असे म्हणत शिंदेंनी नार्वेकरांच्या अध्यक्षपदाची सुरूवात कशी झाली ते सांगितले. तसेच ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’, असा डायलॉगही यावेळी शिंदेंनी मारला.