मुंबई | Mumbai
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Murder Case) प्रकरण चांगलेच गाजले. आधी दिशाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. नंतर तिच्या हत्येचा आरोपही झाला. त्यानंतर दिशाच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचे नाव असल्याची चर्चा आहे. अशातच आता याप्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी माध्यमांशी बोलतांना ‘आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते’, असा दावा केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “राज्य सरकारची (State Government) एसआयटी (SIT) दिशा सालियन प्रकरणाचा तपास करत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी जो प्रश्न उपस्थित केले ते गंभीर आहे. दिशा सालियनचे वडील नुकतेच पोलीस आयुक्तांना भेटले. त्यांनी भेटीत घटनेबाबत विस्तृत माहिती दिली. मालवणी पोलीस ठाण्यात याबाबत पुढील १ ते २ दिवसांत गुन्हा दाखल होईल. या गुन्ह्यात मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरिया आणि इतर आहेत. ८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. ती सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. तिचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. दिशाच्या मृत्यूमागे आदित्यची काहीतरी भूमिका आहे असे समोर आले होते. ८ जूनला रात्री दिशाचा मृत्यू झाला तेव्हा त्या पार्टीत हे सगळे तिकडे उपस्थित होते. मात्र हे प्रकरण तेव्हाच्या सरकारने दाबले. मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास केला नाही”, असे म्हणत निरूपम यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
पुढे ते म्हणाले की, “दिशाच्या मृत्यूमागे (Murder) ड्रग्ज रॅकेट समोर येते. त्यातील समीर खान नावाच्या व्यक्तीला अटक झाली होती. त्यावेळी समीरने आदित्य ठाकरेंना ड्रग्जची सवय आहे असे चौकशीत सांगितले होते. ड्रग्ज पेडलरने जो जबाब दिला आहे तो दिशाच्या मृत्यूमागे काय काय झाले त्याचा हा आधार होता. मालवणी पोलिसांनी याची चौकशी करायला हवी होती परंतु ते झाले नाही. मालवणीत जे तत्कालीन पोलीस होते, त्यांचीही चौकशी सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर गुन्हा दाखल होईल. तसेच याप्रकरणी आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते. त्यानंतर आदित्य ठाकरेंचे नवीन नाव ‘हत्यादित्य’ ठाकरे होईल. यानंतर दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा सहभाग होता हे सिद्ध होईल”, असा दावाही संजय निरूपम यांनी केला आहे.
तसेच “दिशा सालियनवर सामुहिक अत्याचार करण्यात आला. मुलीच्या मृत्यूनंतर ३ दिवसांनी पोस्टमोर्टम करण्यात आले. दिशाचा मृतदेह जिथं सापडला, ती जागा इमारतीपासून २५ फूट लांब आहे. तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या. ती नग्नावस्थेत होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. या प्रकरणात खूप मोठे लोक सहभागी होते तरीही याकडे फार लक्ष देण्यात आले नाही. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतचे प्रकरण वेगळे आहे. आदित्य ठाकरेंवर सुप्रीम कोर्टात अर्ज देत माझी चौकशी झाली आहे. सीबीआयने मला क्लीनचिट दिली आहे असं सांगितले. परंतु दिशा सालियन मृत्यूची चौकशी सीबीआय करत नव्हती. दिशा प्रकरण मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) आहे. त्यामुळे कोर्टाला खोटी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे”, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला.