मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) निकालाच्या १३ दिवसांनंतर आज अखेर नव्या सरकारचा शपथविधी पार पडत आहे. एकीकडे मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असली तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister) स्वीकारणार की नाही? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर यावर पडदा पडला असून देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर एकनाथ शिंदे हे आजच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शपथविधीली अवघे काही तास शिल्लक असताना उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपला आहे.
आजच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ ग्रहण करतील. यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काल रात्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांची समजूत काढण्यासाठी स्वत:वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांची समजूत काढताना आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.
आपण मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. निवडणुकीलाही आपण एकत्रितपणे सामोरे गेलो. तुम्ही केलेल्या मागण्यांवर आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलून तोडगा काढू, मात्र आपण सरकारमध्ये सामील व्हावं. तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवलेली असताना फक्त मी आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यास ते योग्य दिसणार नाही,” अशा शब्दांत वर्षावरील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी काही प्रमाणात दूर झाली असून ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाल्याचे कळते.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाहीत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शपथविधीला अगदी काही तास शिल्लक असतानाही शिंदेंच्या शपथविधीबाबतचा प्रश्न सुटलेला नव्हता. त्यामुळे आज फक्त फडणवीस आणि अजित पवार शपथ घेतील, असे चित्र दिसत होते. मात्र, विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळी दोनवेळा शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. पण, तरी शिंदे त्यांच्या मागणीवर ठाम होते. अखेर फडणवीसांनी शिंदेंची समजूत काढून यावर तोडगा काढल्याने ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे तीनही नेते शपथ घेणार आहेत.