मुंबई | Mumbai
बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) हे आज (दि.२२) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता. परंतु, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच (Congress) राहण्याचा निर्णय घेत भाजप प्रवेशाचा निर्णय अखेरच्या क्षणी रद्द केला. त्यामुळे बुलढाण्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
काँग्रेसकडून दोन वेळा चिखलीचे आमदार राहिलेले राहुल बोंद्रे यांनी २० सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. २२ सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा जंगी प्रवेश सोहळा होणार होता. यासाठी स्थानिक आमदार श्वेता महाले व भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.मात्र, बोंद्रे यांच्या भाजपप्रवेशाची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वरिष्ठ पातळीवर वेगाने हालचाली सुरू केल्या. सोमवारी रात्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राहुल बोंद्रे यांच्यात व्हॉट्सअॅप कॉन्फरन्स कॉलवर थेट संवाद झाला.
राहुल गांधी बोंद्रे यांना काय म्हणाले?
संवादादरम्यान राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना दिलासा देत म्हटले की, “घाबरू नका, दबावाखाली येऊ नका, चूक होईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत, मला सर्व काही माहिती आहे. राहुल गांधींचे हे शब्द ऐकून राहुल बोंद्रे प्रचंड भावूक झाले. त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी “माझे सर्व काही गेले तरी चालेल; मात्र मी काँग्रेस सोडणार नाही, तुमच्यासोबतच राहीन,” असा थेट शब्द राहुल गांधींना दिला. या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवरून स्पष्ट केली भूमिका
दरम्यान आज (मंगळवारी) सकाळी राहुल बोंद्रे यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली असून, यामध्ये त्यांनी “राहुल गांधी यांच्या संघर्षात व लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी” दर्शवली आहे, असा मजकूर आहे.
२५ वर्षांचा राजकीय व सामाजिक प्रवास
नगराध्यक्षपदापासून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या राहुल बोंद्रे यांनी चिखली मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सहकार, शिक्षण, बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे योगदान राहिले आहे. तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागात पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. राहुल बोंद्रे यांनी अखेरच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपकडून होणाऱ्या मोठ्या ‘मेगाभरती’ला मोठा झटका बसला असून, चिखलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




