नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) एक जागा निवडून येणार असून, या जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यास ते आघाडीचे सर्वसंमतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीवर भाष्य केले.
यावेळी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः इच्छुक नसतील, तर काँग्रेस या जागेवर आपला उमेदवार निश्चितपणे उभा करेल. यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाशी चर्चा केली जाईल. काँग्रेसमध्ये या जागेसाठी अनेक जण इच्छुक असून, पक्ष तरुण नेतृत्वाला संधी देण्याबाबत विचार करत आहे.
दरम्यान, याप्रसंगी खासदार डॉ. शोभा बच्छाव ,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील),शरद आहेर, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व भरत टाकेकर, प्रदेश काँग्रेस सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाटील पानगव्हाणे, डॉ. दिनेश बच्छाव, गुणवंत होळकर,उल्हास सातभाई आदी उपस्थित होते.
राज्यसभेच्या उमेदवारीवर सूचक वक्तव्य
विधान परिषदेवर संधी न मिळाल्यास राज्यसभेवर जाणार का? या प्रश्नावर थोरात यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. “मी राजकारणी आहे आणि राजकारणात (Politics) प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते,” असे सांगत त्यांनी भविष्यातील संधींबाबतचे पर्याय खुले असल्याचे सुचित केले.
अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त करताना थोरात यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. “अजित पवार यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र या अपघाताबाबत मनात शंकेची पाल चुकचुकते. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सत्ताधाऱ्यांवर टीका
विरोधी पक्षातील अनेक नेते केवळ चौकशा टाळण्यासाठी आणि सहकारी संस्थांच्या फायद्यासाठी सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपत गेलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांचे उदाहरण देत, सत्ताधारी पक्षात जाऊनही अनेकांचा भ्रमनिरास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.





