Friday, July 24, 2026
HomeनगरAhilyanagar : शिक्षणातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भिंगार शहर बंद

Ahilyanagar : शिक्षणातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भिंगार शहर बंद

वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन || विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नीट परीक्षा पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिंगार शहरासह अहिल्यानगर शहरातील विविध भागांत गुरूवारी (23 जुलै) बंद पाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना शांततेच्या मार्गाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. नीट परीक्षा पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर व संसदेसमोर देशभरातील विद्यार्थी, युवक व पालकांनी शांततापूर्ण आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा तसेच काही आंदोलकांना अटक करून त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई निषेधार्ह असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनिफ शेख, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, युवा जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाणे, प्रवीण ओरे, सुहास धीवर, सुरेश पानपाटील, देविदास भालेराव, सुधीर धामणे, अ‍ॅड. योगेश गुंजाळ, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, चंद्रकांत नेटके, अंकुश साळवे, जीवन कांबळे, संकेत शिंदे, प्रतीक ठोकळ, संजय शेलार, राजीव भिंगारदिवे, अमर निरभवने, बाजीराव राजगुरू, संध्या मेढे, अविनाश साठे, आढाव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मेलोडी’ चॉकलेट वाटून उपरोधिक निषेध
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेदरम्यान भिंगारमध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा उपरोधिक निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा रंगली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. मेलोडी चॉकलेट वाटपाच्या अनोख्या पध्दतीमुळे हे आंदोलन विशेष चर्चेचा विषय ठरले.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता समाधीवर बसला!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबांच्या समाधीवर चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता बसल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर शिर्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कोट्यवधी साईभक्तांच्या...