Sunday, September 13, 2026
HomeराजकीयSunil Tatkare : सुनील तटकरेंनी 'गुंगी गुंडिया'च्या पोस्टवरुन काँग्रेसला सुनावलं; म्हणाले, 'दिलगिरी...

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी ‘गुंगी गुंडिया’च्या पोस्टवरुन काँग्रेसला सुनावलं; म्हणाले, ‘दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, काही वेळेला…’

मुंबई । Mumbai

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ घातला. या घटनेनंतर आता महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. “सुनेत्रा पवारांबद्दल काँग्रेसने केलेल्या पोस्टचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेसने काल रात्री उशिरा यावर दिलगिरी व्यक्त केली असली, तरी केवळ माफी मागून हा गंभीर विषय संपत नाही. काहीवेळेला सार्वजनिक जीवनात काय बोलावे याचे भान असावे लागते, मात्र दुर्दैवाने काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेतृत्व हे भान पार विसरले आहे,” अशा शब्दांत तटकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. काँग्रेसला सध्या जनतेत कोणताही प्रतिसाद उरलेला नाही. त्यामुळे केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ’ अशा दर्जाहीन पद्धतीचे राजकारण केले जात आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करताना म्हटले की, “काँग्रेसची बुद्धी आणि मन दोन्ही भ्रष्ट झाले आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. २०२४ मध्ये यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा असाच अपमान केला होता, तेव्हा राज्यातील महिलांनी त्यांना योग्य जागा दाखवली होती. हा केवळ सुनेत्रा पवारांचा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींचा अपमान असून जनता काँग्रेसला नक्कीच धडा शिकवेल.”

तसेच भाजप महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही “विचार मांडायला बुद्धी उरली नाही की शिवराळ भाषा सुरू होते,” असे म्हणत काँग्रेसच्या या वृत्तीवर जोरदार प्रहार केला. या वादामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची 15 कोटींची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सावेडी येथील डॉक्टरांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती व खोटे मालक उभे करून तब्बल 14 कोटी...