मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आज सकाळी अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत आज (गुरुवार) सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा फिसकटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता या भेटीबाबत सामंत आणि देशपांडे यांनी माध्यमांशी बोलतांना खुलासा केला आहे.
यावेळी बोलतांना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “नवी मुंबईतील (New Mumbai) पनवेलच्या फुल बाजारासंदर्भात एक प्रश्न होता त्यासाठी मंत्री सामंत यांची भेट घेतली. तसेच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट (Meet) का झाली, याबाबत मला काहीही माहिती नाही”, असे त्यांनी म्हटले.
तर मंत्री उदय सामंत म्हणाले की, “मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एका महत्त्वाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना भेटायला आले होते. पंरतु, ते दुसऱ्या बैठकीसाठी सह्याद्री या शासकीय निवासस्थानी गेल्याने त्यांनी माझी भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा एक स्वतंत्र विचार असून, त्यांनी आजच्या भेटीतून कोणत्याही अटींना जुमानत नाही हे उद्धव ठाकरेंना दाखवून दिलं आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी ठाकरेंना टोला लगावला. तसेच राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबत मला काहीही माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे आपल्यासोबत असावी यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.




