मुबंई | Mumbai
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून वरळीतील एनएसआय डोममध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. तर, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील भाषण करुन राजकीय फटकेबाजी केली. दोन्ही नेत्यांच्या भाषणानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा देत मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावर बोलावले. मात्र, तरीही ज्यांची नाव घ्यायचे राहिले, त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले की, “हिंदी सक्तीच्या (Hindi Language) बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो”, असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे भाषणात काय म्हणाले होते?
“नुसत्या मोर्चाच्या चर्चेनंतर माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही. मी माझ्या मुलाखतीमध्ये (Interview) म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपीठावर येत आहोत. ज्या माननीय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fandavis) जमलं” असे राज ठाकरेंनी म्हणताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.




