मुंबई | Mumbai
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar NCP) आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभा सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह महायुतीमधील चार ते पाच जणांचे मंत्रिपद जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राऊत म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्य मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव आहे, याबाबत आपल्याकडे माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “राज्यात ६५० शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या (Suicide) केल्या आहेत. त्यानंतरही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषीमंत्री जात नाही. त्यांच्याकडे वेळ नाही. मात्र त्यांना रमी पत्त्यांचा डाव खेळण्यात वेळ आहे. केंद्रातील सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसगडमधील अनेक राजकीय नेत्यांवर ऑनलाइन गेमिंग संदर्भात कारवाई झाली.काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या चिरंजीवांना देखील ईडीने (ED) अटक केली. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातील राजकारणी करत आहेत. सत्ताधारी करत आहेत. त्यांचा ऑनलाईन गेमिंगच्या पैशांमध्ये मोठा सहभाग आहे. त्यांच्यावर ईडीने किंवा सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही” असेही संजय राऊत यांनी म्हटले.





