मुंबई | Mumbai
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मतदार याद्यांचा गोंधळ, मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार (Voter List) नोंदणी यावर आक्षेप घेत काल (मंगळवारी) देखील या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवदेन देत ७ ते ८ प्रश्न विचारत प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा एकदा राज ठाकरेंसह मविआच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. मग आम्ही कुणाशी बोलू? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही त्यामुळे व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या. जर त्रुटीसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? त्यापेक्षा थेट ठराविक लोकांसाठी घेतलेली निवडणूक असे जाहीर करुन टाका, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले.
तर राज ठाकरेंनी “सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत जाहीर करण्यात आलेला निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला अशी मोठी मागणी राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांच्याकडे केली. तसेच मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला निवडणुकीसाठी तयार नसल्याचे सांगा. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असे म्हणत आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असे म्हणत ८०-९० हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, आजच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळावर अनेक मुद्दे उपस्थित केले. यात बाळासाहेब थोरात यांनी “आम्ही विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या, त्यावर काम झाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत, असे म्हटले. तर जितेंद्र आव्हाड यांनी मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत दुबार मतदार आहेत, तुमची यंत्रणा सज्ज नाही,” अशी तक्रार केली.




