मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) ‘सामना’ दैनिकात दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीचे खापर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मतभेदांवर फोडले आहे. तसेच त्यांनी निवडणुकी आयोग, भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खासदार राऊत यांनी उद्धव ठाकरेंना “जे तुम्ही लोकसभेला कमावलं, ते विधानसभेला (Vidhansabha) गमावलं, फक्त सहा महिन्यात हे कसं घडले? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार (Voting) कसे वाढले, हे लोकांसमोर आलं आहे. लाडकी बहीणसारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाली की स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्यावेळी चार-चार,पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचे म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. असे त्यांनी म्हटले.
तसेच “लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. मविआत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे हे आपलेपण होते. विधानसभेला मला जिंकायचं हा आपल्यात जो मी पणा आला तेव्हा पराभव झाला, अशी कबुली देखील उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत दिली.
आपण केलेली कामे लोकांना सांगण्यात कमी पडलो
विधानसभेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडलाच, काही अंशी सत्य असेल, पण प्रत्यक्ष मी बघायला गेलो नाही. पण हे आपल्याकडून जी उणीव राहिली ती आपण स्वीकारली पाहिजे, ती म्हणजे आपण केलेली कामे आपण लोकांना सांगण्यात कमी पडलो. आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शिवभोजन थाळी सुरु केली, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. कायदा-सुव्यवस्था चांगली होती. मी मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात यांच्यासारखे ‘कटेंगे तो बटेंगे’ असं केलं नाही. मी सगळ्यांना समानतेने वागवलं. सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यावेळेला मी स्वत: जबाबदारी घेऊन लोकांसमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गेलो. जनतेने मला कुटुंबातलं एक मानलं. यासारखं दुसरं समाधान नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हव्या
महायुतीला पाशवी बहुमत मिळाले पण जल्लोष कुठे झाला नाही. अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघायला पाहिजे होता, मात्र तो अवाक् का झाला? ग्रामीण भागातील अनेक लोक म्हणतात, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केले तरी आमच्या गावात तुम्हाला इतकी मते कशी मिळाली माहिती नाही. पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात. ईव्हीएम हँकिंगचा मुद्दा वेगळा पण लोकशाहीत आरटीआयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर माझी माहितीही मिळाली पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान व्हायला पाहिजे. मुळात ईव्हीएम का आणले, मतमोजणीचा वेळ वाचवायला, मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, ती वेळ का धरत नाही. अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होते ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.





