Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : हे दळभद्री सरकार भस्म करा, आता बदलाची ...

Uddhav Thackeray : हे दळभद्री सरकार भस्म करा, आता बदलाची गरज – उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होती. पंरतु, काल (शनिवारी) त्यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वांगचूक यांच्या समर्थनार्थ दिल्लीतील आंदोलनस्थळी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

- Advertisement -

या दोन्ही आंदोलकांच्या समर्थनार्थ आज (रविवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मुंबईतील आझाद मैदान आणि दादर येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आझाद मैदानातील आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “हे सरकार (Government) आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे दळभद्री आणि हुकूमशाही सरकार आता बदललंच पाहिजे. आज तुमच्यात जी आग दिसत आहे, ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकूमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. तुम्ही सर्वांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला,” अशा अत्यंत कडक आणि आक्रमक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

लढा केवळ एकाचा नाही, सरकार बदलण्याची गरज

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आंदोलनस्थळी एक पोस्टर पाहिलं, ज्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण राजीनामा ही अत्यंत शुल्लक गोष्ट आहे. आपल्याला केवळ मंत्री नको, तर अख्खं सरकारच बदलायचं आहे. जे सरकार तरुण पिढीला रोजीरोटी, रोजगार आणि शिक्षण देऊ शकत नाही, ते सत्तेवर राहण्यास नालायक आहे. हा लढा फक्त सोनम वांगचूक किंवा कोणा एका व्यक्तीचा नाही, तर देशाच्या भवितव्याचा आहे. सत्तेतील भ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही, अशी शपथ घेऊन आपण या लढ्याची सुरुवात करत आहोत”, असे त्यांनी म्हटले.

भागवत साहेब, ‘आम्ही हिटलरसारखे नाही’ हे मोदींना सांगा!

नागपूर दौऱ्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मे महिन्यात एक वक्तव्य केलं होतं की, पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. जो पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवतो, आपल्या सैनिकांवर हल्ले करतो, त्यांच्याशी चर्चा करायला सरसंघचालक मोहन भागवत यांची संमती असते. भागवत म्हणतात, ‘हम हिटलर जैसे नही है.’ अहो भागवत साहेब, आम्ही हिटलरसारखे नाही हे आम्हाला सांगण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा! जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतो, त्याच्याशी तुम्ही चर्चा करायला तयार आहात. पण जो माणूस (सोनम वांगचूक) भारतीय सैनिकांसाठी उष्ण तापमानात राहण्याकरिता ‘सोलर टेंट’ बनवतो, त्याच्याशी चर्चा करायला सरकारकडे वेळ नाही? वांगचूक यांच्या आंदोलनासाठी एवढा पोलीस फौजफाटा तैनात का केलाय? हिंमत असेल तर हा फौजफाटा पाकव्याप्त काश्मीरात घुसवा” असेही त्यांनी म्हटले.

…म्हणून हे सरकार ‘झुरळाला’ घाबरतं!

भाजपच्या ‘मेलोडी’ (मोदी-मेलॉनी ट्रेंड) या सोशल मीडिया चर्चेवर टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही जण म्हणतात ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’. तिकडे यांचे चॉकलेटचे खेळ चालतात आणि इकडे आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात. आम्ही शेंडी-जानव्याचे नव्हे, तर पक्के देशभक्त हिंदू आहोत. आज देशात जे काही सुरू आहे, ते भागवतांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे का? असले हिंदू राष्ट्र आम्हाला कदापि मान्य नाही”, असे त्यांनी म्हटले. तसेच “हे सरकार तरुणांना ‘झुरळ’ समजतं. पण त्यांनी इतिहास विसरू नये; देशासाठी प्राण देणारे भगतसिंग आणि इतर क्रांतिकारक तरुणच होते. आपल्या समाजात सामान्य महिला झुरळाला घाबरते असं म्हणतात, पण इथे जगातील सर्वात मोठा दावा करणारा पक्ष, देशाचे पंतप्रधान आणि संपूर्ण सरकार झुरळाला घाबरत आहे. कारण हे सरकार भाड्याने आणलेली, चोरलेली माणसं गोळा करून बनलं आहे. यांच्या पाठीशी स्वतःचं असं कोणीच नसल्यामुळे हे घाबरलेले आहेत”,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

हरणबारी धरण ओव्हरफ्लो; मोसम खोरे सुखावले

0
अंबासन | वार्ताहर Ambasan गत तीन-चार दिवसापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोसमखोर्‍यास वरदान ठरलेले हरणबारी धरण आज सकाळी तुडूंब भरल्याने सांडव्यावरून पाणी कोसळू लागल्याने...