Saturday, August 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Rain Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; नाशिकसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार...

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने (Rain) अखेर राज्यात पुनरागमन केले आहे. पावसामुळे खरीप हंगामाच्या मध्यावर पिके करपू लागली होती आणि शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल हवामान प्रणाली आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने (IMD) घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) कमी दाबाचे क्षेत्र आता चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीत बदलले असून ते समुद्रसपाटीपासून ४.५ किमी उंचीपर्यंत सक्रिय आहे. तसेच मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज रविवारी राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे. यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे तर मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये अंतर्गत भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

२१ आणि २२ जुलैला नाशिक-पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. यात २१ जुलै २०२६ रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथा भागात पावसाचा जोर वाढेल. तर २२ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

सतर्कतेचे आवाहन

कोकण आणि घाटमाथा परिसरातील नागरिकांनी (Citizen) तसेच पर्यटकांनी पुढील ३-४ दिवस काळजी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या