मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीसह मनसेकडून आज (०१ नोव्हेंबर) रोजी मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला जाणार आहे. या मोर्चाला शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा दुपारी ०१ वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबणार आहे.
या मोर्चासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकलने दादरहून चार्चेगेटसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत. चर्चगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर राज ठाकरे काही काळ हॉटेलमध्ये थांबत आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास ते मोर्चात सहभागी होतील.
दरम्यान, आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केले होते. तसेच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले होते.
दहा वाजताच दादर स्टेशनवर
सकाळी दहा वाजताच्या सुमारासच राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे यासारखे नेते उपस्थित होते. पश्चिम रेल्वेवरुन चर्चगेटला जाण्यासाठी स्लो लोकल पकडायला ते प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. यावेळी सुरक्षारक्षकांचा गराडा राज ठाकरेंना होता.





