नाशिक | Nashik
जिल्ह्यातून पावसाने वेळेआधीच काढता पाय घेतल्यामुळे शेतकरी (Farmer) वर्ग मोठ्या चिंतेत सापडला होता. ऐन काढणीच्या वेळी भात पिकांसह हातातोंडाशी आलेली इतर पिके करपण्याची भीती व्यक्त केली जात होती, तर दुसरीकडे नाशिककर (Nashik) नागरिक कडक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, आज (शनिवारी, २४ ऑक्टोबर) अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तर शेतकर्यांनाही काहीसा आधार मिळाला आहे.
महिनाभराने बरसला पाऊस
नाशिक शहरात (Nashik City) यापूर्वी २१ सप्टेंबर २०२६ रोजी पाऊस झाला होता. त्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर म्हणजे आज २४ ऑक्टोबर रोजी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, चांदशी शिवार, एम.जी. रोड, पंचवटी, द्वारका आणि सिडको परिसरात चांगला पाऊस झाला.
उकाड्यानंतर पावसाचे आगमन, नागरिकांची तारांबळ
आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. दुपारी १२ च्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांची आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यातही हजेरी; पिकांना दिलासा
केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी यांसारख्या विविध भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या या आगमनामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले असून बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.




