अहिल्यानगर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सध्या लाल कांद्याची काढणी जोमाने सुरू असून राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर सारख्या कांदा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात माल बाजारात येत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याचा ओघ वाढला आहे. शनिवारी सोलापूर बाजार समितीत तब्बल ७६,२१७ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक नोंदवण्यात आली. येथे कांद्याला किमान १०० तर कमाल २५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. दुसरीकडे, आळेफाटा बाजार समितीत रविवारी ४२,६०० गोणींची आवक झाली. गेल्या २० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढी प्रचंड आवक झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा-घोडेगाव बाजार समितीत ३९,५७५ गोणी कांदा विक्रीसाठी आला होता, तिथे ४०० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पुण्यातील बाजारपेठेत २३,४८४ गोणी, राहुरीत ९,५१४ आणि कोपरगावात ६,२६० गोणी कांद्याची आवक झाली. बहुतांश ठिकाणी आवक वाढल्यामुळे सरासरी दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनीही दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यंदा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणासारख्या नैसर्गिक संकटांशी झुंज देत मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक जोपासले होते. मात्र, काढणीच्या वेळी काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून कांद्याच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. दर्जा घसरल्याने आणि त्यातच आवक वाढल्याने कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत आहे.
मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ट्रकच्या ट्रक उभे असून, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन कांदा उत्पादकांना आधार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





