संदीप जाधव
नट होणं सोपं नसतं. चित्रपटात किंवा नाटकात भूमिका सादर करताना कलाकाराला मोठे कष्ट घ्यावे लागतात. जीव ओतून पात्रात रमरस व्हावे लागते. मनापासून नाटक करणार्या नाट्यकर्मींना खूप परिश्रम, त्याग करावा लागतो. अनेकदा नाटकातील भावलेल्या भूमिका जणू आपलीच कहाणी असल्याचा भास अभिनेत्याला होतो. अशाच एका नाट्य अभिनेत्याची कहाणी दर्शवणारी रंगतदार कलाकृती राज्य नाट्य स्पर्धेतील ‘नट नावाचं नाटक’ या दोन अंकी नाटकात पाहायला मिळाली.
अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक डॉ. समीर मोने आहेत. समजण्यास जरासे क्लिष्ट असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. रविंद्र काळे यांनी मोठ्या कल्पकतेेने केले. नाटकातील मुख्य नायकाची भूमिकाही त्यांनीच केली. प्रत्येक प्रसंगानुरूप ताणल्या जाणार्या उत्सुकतेने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले. नाटकातील तीन कलाकारांना विविध प्रसंगांत दोन दशकाहून अधिक भूमिका साकारताना मोठी मेहनत करावी लागल्याचे दिसले.
भाऊसाहेब हे नाटकातील मध्यवर्ती पात्र. नाटकात अनेक वर्षे नायकाची भूूमिका साकारल्यानंतर आता वृद्धत्वात त्याला आत्मचरित्र लिहायचे असते. पण त्याचेच मन त्याला प्रतिप्रश्न करते. त्यामुळे भाऊसाहेब व्यथित होतो. लॉरेन्स ऑलिव्हिये या अभिनेत्याला आदर्श मानणारा भाऊसाहेब ऑथेल्लोे, हॅमलेट, सुधाकर, आबासाहेब औशीकर, गणपतराव बेलवणकर या विविध नाटकातील पात्रांच्या प्रेमात पडलेला असतो. यातील पहिल्या चार भूमिका भाऊसाहेबने केलेल्या असतात. या लोकप्रिय पात्रांचे जीवन जणू आपणच जगलो असल्याचा भास त्याला होतो. आत्मचरित्र लिहिताना त्यात कुठल्याही स्त्रीचा उल्लेख त्याला नको असतो. कारण त्यांनी केलेली फसवणूक त्याला आठवते. मग नाटक फ्लॅशबॅकमध्ये जाते.
यात हॅमलेट, एकच प्याला, खेळिया, ऑथेल्लोे या नाटकांचे प्रसंग दाखविले जातात. या सर्वच नाटकांतील विविध प्रसंगांत प्रेयसी, आई, पत्नी, रखेल महिला आदी स्त्री पात्र त्याच्यापासून दूर गेलेल्या असतात. त्याने भाऊसाहेब व्यथित होतो. विविध रंगलेल्या प्रसंगांनी नाटकाचा वेग वाढतो. उत्सूकता ताणली जाते. प्रत्येक वेळी भाऊसाहेबने केलेल्या पात्रांच्या हाती निराशाच येते. त्याने केलेल्या या भूमिका त्याला स्वतःच्या वाटू लागतात. नाटक फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर भाऊसाहेबचे मन त्याला आणखीणच सतावते. आत्मचरित्रात समावेश करणार असलेले प्रसंग त्याच्या जीवनात घडलेलेच नसतात. केवळ पात्रांच्या प्रेमात पडल्यामुळे त्याला आपल्या जीवनातही अशाच घटना घडल्याचा भास होतो. त्याचे माणूसरूपी मन त्याला याबाबत सतत जाणीव करून डिवचच असते. त्यामुळ अतिनिराशेच्या गर्तेत ओढले गेलेला भाऊसाहेब हतबल होतो. शेवटी चाकूने स्वतःचे जीवन संपवतो.
वैचारिक थाटणीचे लेखक डॉ. समीर मोने यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. रविंद्र काळे यांनी केले. मुळात स्पर्धेसाठी हे नाटक निवडणे तसे धाडसाचे काम. आव्हानात्मक कामं नियोजनबद्धरित्या पूर्ण करण्याची आवड असल्याने प्रा. काळे यांनी हे नाटक निवडलं असावं. या जड वाटणार्या नाटकासाठी त्यांनी दिग्दर्शनात मोठे परिश्रम घेतल्याचे नाटकातील विविध प्रसंगांवरून दिसले. प्रत्येक पात्राला अनेक भूमिका कराव्या लागल्या. तरीही प्रत्येकाने विविध भूमिकांमध्ये पकडलेले योग्य ‘बेअरिंग’ हे काळे यांचे यश मानावे लागेल. अनेक प्रसंगांनी भरभरून टाळ्या घेतल्या.
नाटकातील भाऊसाहेब या मुख्य भूमिकेत प्रा. काळे हेच होते. तरुण, मध्यमवयीन व वयोवृद्ध अशा विविध वयोगटातल्या भूमिका साकारताना त्यांनी अतिशय सुरेख अभिनय केला. आत्मविश्वासू हावभाव, अलंकारिक शब्दांचा प्रचंड मारा असलेले स्पष्ट संवाद आणि त्याला मिळालेली देहबोलीची यथायोग्य साथ यामुळे त्यांचे प्रत्येक पात्र खुलले. मद्याच्या नशेत असलेला सुधाकर, संशयी हॅमलेट, कावेबाज ऑथेल्लोे या उत्कृष्ट भूमिकांना रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला.
भाऊसाहेबचा मनरूपी माणूस रियाज पठाण यांनी रंगमंचावर आणला. धीरगंभीर हावभाव त्यांनी चांगल्याप्रकारे दर्शवले. विविध प्रसंगांतील 9 भूमिका साकारताना त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचे दिसले. रेगे काका, खुनशी सावकार, नाट्य निर्माता, ऑथेल्लोचा सहकारी इयागो, वेशा महिलेचा पंटर ही पात्रे त्यांनी उत्तमरित्या रंगवली. प्रत्येक पात्राची भाषा, हावभाव वेगवेगळे असूनही त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला.
नाटकातील एकमेव स्त्रीपात्र भाग्यश्री जोशी यांनी वठवले. त्यांच्या वाट्याला अनेक भूमिका आल्या. त्यांनी हॅमलेट नाटकातील प्रेयसी राधिका, आई, डेव्हिमोना, सरोजा, सुधाकरची पत्नी, वेशा व्यवसायातील महिला या भूमिका उठावदारपणे मांडल्या. प्रत्येक भूमिकेचा ढंग वेगळा असूनही प्रत्येक भूमिका त्यांनी सहजपणे पार पाडली. अर्थात यामागे मोठे परिश्रम त्यांना करावे लागले. भावनाविवश पत्नी, प्रेमळ राधिका आणि बिनधास्त बोलणारी वेशा या भूमिका फारच रंगवल्या. संवादातील लय त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. त्यांचा कायिक अभिनयही भारीच ठरला.
गायकाच्या भूमिकेत असलेल्या प्रा. आदेश चव्हाण यांनी उत्कृष्टपणे गीत सादर केले. नाटकात दोन वेळा येऊन त्यांनी गायिलेल्या गीतांनी भरभरून टाळ्या घेतल्या. नेपथ्याची जबाबदारी दीपक अकोलकर यांची होती. अनेक प्रसंगानुरूप नेपथ्य बदलावे लागत होते. त्यामुळे त्यांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. काही प्रसंगात हलत असलेल्या भिंती खटकल्या. नटराजाची मूर्ती, दगडी भिंती, त्यावरील विविध छायाचित्रे समर्पक वाटली.
प्रकाश योजना गणेश लिमकर यांची होती. विविध प्रसंग प्रभावीपणे करण्यात त्यांनी दिलेले रंगीबेरंगी स्पॉट कारणीभूत ठरले. संगीत शीतल देशमुख यांचे होते. भाऊसाहेब व महिला पात्राचे अनेक प्रसंगांवेळी दिलेले पार्श्वसंगीत परिणामकारक वाटले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. अनेक भूमिकांच्या पात्रांची रंगभूषा करणे ही मोठी कसरत होती. त्यांनी ती लिलया पार पाडली. वेशभूषा परवीन पठाण व ओंकार जोशी यांनी सांभाळली. प्रत्येक पात्राच्या पेहरावाकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिल्याचे दिसले. नृत्यदिग्दर्शन राम पठारे यांनी केले. महिला पात्राचे नृत्य प्रेक्षकांना विशेष आवडले.
या नाटकाच्या निमित्ताने वेगळ्या थाटणीची नाट्यकृती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. नाटक समजायला सोपे नसले तरी विविध प्रसंगांची जुळवाजुळव दिग्दर्शक प्रा. काळे यांनी कल्पकतेने केल्याने नाटक उमलले आणि उत्तरार्धात चांगलेच फुलले.




