अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यात रविवार, २८ जून रोजी दोन सत्रांत होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अचानक स्थगित करण्यात आली आहे. शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून परीक्षेची अंतिम तयारी युद्धपातळीवर सुरू असतानाच, दुपारी अचानक परीक्षा स्थगितीचा आदेश धडकल्याने खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अहोरात्र अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.
या परीक्षेसाठी राज्यातून तब्बल ६ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात ५३ परीक्षा केंद्रांवर एकूण ३१ हजार ६५५ भावी शिक्षकांनी परीक्षेची तयारी केली होती. यामध्ये पेपर क्रमांक १ साठी १३ हजार ४९१, तर पेपर क्रमांक २ साठी १८ हजार १६४ उमेदवारांचा समावेश आहे. नगर शहरात दोन्ही पेपरसाठी ५३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेने बंदा ‘टीईटी’ परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना केल्या होत्या. परीक्षा केंद्रावर ओळख पटवण्यात अडचण येऊ नये, म्हणून यंदा प्रथमच चेहरा झाकणारा बुरखा, मास्क, दुपट्टा आणि टोपी यांसारख्या वस्तूंबर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सर्व केंद्रांवर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, फेस रेकशिशनफ (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) आणि एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चेट मुख्य नियंत्रण कक्षातून वॉच ठेवला जाणार होता.
शनिवारी सकाळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व केंद्र संचालकांची महत्त्वाची बैठक घेतली. परीक्षा सुरळीत आणि विनाअडथळा पार पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. मात्र, ही बैठक संपून प्रत्यक्ष केंद्रांवर अंतिम तयारी सुरू असतानाच दुपारी परीक्षा स्थगितीचा सरकारी आदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.




