Monday, August 17, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय...

Uddhav Thackeray : वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल

परभणी ।

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज परभणीतील जाहीर सभेतून बंडखोर आणि फुटीर खासदारांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. “लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाऊस आला, तेव्हा वाघाचं कातडं पांघरलेलं ते गाढव होतं,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी स्थानिक खासदार संजय जाधव यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावाती दौरा आखला असून, या दौऱ्यांतर्गत परभणीत झालेली ही सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत वादळी ठरली.

- Advertisement -

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बंडखोरीच्या कारणावर बोट ठेवले. ते म्हणाले, “एक हात राहुल पाटील यांनी पकडला, तो आजही सोबत आहे. पण दुसरा पळाला. म्हणतात विकास करायला पळाला! कुणाचा विकास? हा लोकांचा विकास नसून स्वतःचा खासगी विकास निधी गोळा करण्यासाठी झालेली ही पळवापळवी आहे.”

फुटीर लोकप्रतिनिधींच्या बदललेल्या जीवनशैलीवर आणि व्हीआयपी संस्कृतीवर कडाडून टीका करताना ठाकरे म्हणाले, “सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत आहेत. हे लोक आता प्रायव्हेट विमानाने फिरत आहेत, बदाम खात आहेत. दुसरीकडे आपल्या राज्यातील शेतकरी मात्र आजही हालअपेष्टा सहन करतोय. विदर्भातील एक दलाल खरेदी-विक्री करणाऱ्या नाक्यावर उभे राहतात तसे उभे आहेत. यांनी जनाची आणि मनाची लाजलज्जा गुंडाळून ठेवली आहे. एवढा पैसा यांच्याकडे कुठून आला?” असा सवाल त्यांनी जनतेसमोर उपस्थित केला.

ठाकरेंनी पक्षाच्या अस्तित्वावर भाष्य करताना कायदेशीर मुद्द्यांनाही हात घातला. “काही लोक म्हणतात उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आमची केस गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यावर कोणी आत्मपरीक्षण का करत नाही?” असा सवाल त्यांनी केला. पक्षाची व्याख्या स्पष्ट करताना ते म्हणाले, “दोन-चार लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नाही. जनता आणि मतदार म्हणजे खरा पक्ष असतो. दोन तृतीयांश सभासद इकडे तिकडे गेले आणि विलीन झाले, तर त्यांना कायदेशीर मान्यता मिळते का? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या मते हे कायदेशीर नाही. जर देशात कायद्याचे राज्य असेल, तर ही बंडखोरी बाद ठरली पाहिजे.”

आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांवर अद्याप विश्वास असल्याचे सांगत त्यांना कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. “सुरुवात वरून झाली पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी देशाचा कायदा आणि संविधान पाळले पाहिजे. अधिकाराचा वापर मर्जीनुसार होऊ शकत नाही. जे पदावर बसले आहेत, त्यांनी घटनेचे उल्लंघन करू नये. ‘घटना तोडणारे अध्यक्ष’ म्हणून इतिहासात तुमची नोंद होऊ देऊ नका,” असा जाहीर इशारा त्यांनी दिला.

ताज्या बातम्या