मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्सीखेचीनंतर अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) महायुतीचे (Mahayuti) अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. जागांवरील दावे-प्रतिदाव्यांमुळे चर्चेला वेग आला होता. मात्र, अखेर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला असून, त्यानुसार भाजप (BJP) ११ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) ४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. प्रदेश आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती.
विशेषतः शिवसेना (Shivsena) सात जागांच्या मागणीवर ठाम असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर पक्षाला चार जागांवर समाधान मानावे लागल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अतिरिक्त एका जागेसाठी जोरदार प्रयत्न करत अखेर दोन जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, आता उमेदवारांच्या नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




