मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराने वेग घेतला असताना शिवसेना शिंदे गटाने पुणे शिक्षक मतदारसंघात (Pune Teachers Constituency) भाजपच्या (BJP) अधिकृत उमेदवाराला उघड विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री पुण्यात बोलताना शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप (Sachin Sanap) यांना पाठींबा असल्याचे जाहीर केले. शिंदेंच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे गटातील राजकीय धुसफूस समोर आली आहे.
विधान परिषदेची निवडणूक काही अपवाद वगळता आम्ही महायुती (Mahayuti) म्हणूनच लढवत आहोत. परंतु, पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिंदेच्या या निर्णयाने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेनेकडून युती धर्म पळाला जात नसेल तर त्याचे पडसाद अमरावती शिक्षक मतदारसंघात (Amravati Teachers Constituency) उमटू शकतात. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक निवडणूक लढवत आहेत.
विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विधान परिषदेचे उमेदवार दिल्लीहून जाहीर केले असतानाही शिंदे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघात निकटवर्ती मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली. माघार घेऊनही शिंदे यांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी अपक्ष सानप यांना पाठींबा घोषित केल्याने भाजपला धक्का बसला आहे.
नाशिकचा वचपा काढण्याचा डाव
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला जाहीर विरोध करून एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा वचपा काढण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच वर्षी जून महिन्यात विधान परिषदेच्या नाशिक विभाग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नाशिकमध्ये भाजपने दराडे यांना विरोध करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते याना बळ दिले होते. त्यामुळे शिंदे गटाला नाशिकची (Nashik) जागा गमवावी लागली. आता नाशिकच्या पराभवाची पुणे शिक्षक मतदारसंघात परतफेड करण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळालेले सचिन सानप हे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला.
सचिन सानप हा मूळचा शिवसेनेचा आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल. इतर चार ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवतोय आणि काम करतोय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे




