नाशिक | Nashik
महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा (Maharashtra Vs Vadodara ) २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना (Ranji Match) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत असल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबच्या लॉनवर बसून प्रेक्षकांना आता मॅच बघता येईल
.आतापर्यंत फक्त परदेशात्त उपलब्ध असलेल्या या लॉनवर बसून सामना बघण्याची सोय आता नाशिककरांना देखील झाल्यामुळे रसिकांना या खास टेकडावरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद लुटता येणार आहे. त्याबरोबरच दोन्ही संघांसाठी अद्ययावत ड्रेसिंग रूम्स व उत्तम पॅव्हेलियन हॉलची सुविधा उपलब्ध असेल. सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून त्र्यंबक रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील मुख्यद्वार तसेच गेस्ट हाऊसकडील द्वाराने मैदानावर प्रवेश करता येणार आहे.
पार्किंगसाठी (Parking) ईदगाह मैदानाचा वापर करता येणार आहे. २३ जानेवारीपासूनच्या नियोजित सामन्यात भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महाराष्ट्राचा कर्णधार सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वडोदरा कर्णधार अष्टपैलू कृणाल पंड्या हे नामवंत खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच आपल्या नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलु खेळाडू, महाराष्ट्र संघाचा महत्वाचा गोलंदाज सत्यजित बच्छाव हा देखील या संघात असू शकतो. युवा खेळाडू अर्शिन कुलकर्णी देखील या चमूत आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल (विनोद) शहा यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी समीर रकटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व संबंधितांना गेल्या जवळपास वीस एक वर्षांतील, यापूर्वीच्या दहा रणजी ट्रॉफी सामन्यांच्या दिमाखदार व यशस्वी आयोजनाचा उत्तम अनुभव आहे. खेळाडूंपासून संघ व्यवस्थापकापर्यंत सर्वानीच वेळोवेळी तसा अभिप्राय दिला आहे. यामुळेच नाशिक आणखी एका यशस्वी रणजी ट्रॉफी सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज होत आहे. या सामन्याच्या (Match) खेळपट्टीच्या तयारीसाठी बीसीसीआयतर्फे खेळपट्टीतज्ञ अभिजित पिपरोडे हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
सामन्यासाठी सहकार्य – शर्मा
नाशिकचे जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदसिद्ध अध्यक्ष जलज शर्मा यांनी आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबला भेट दिली. याप्रसंगी शर्मा यांनी रणजी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि सामन्यासाठी त्यांचेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही दिली.