Sunday, June 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार?

Maharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून फेब्रुवारी महिना असूनही पावसाने मुक्काम ठोकला आहे. राज्याच्या विविध भागांत सध्या विसंगत हवामान पाहायला मिळत आहे. सकाळी कडाक्याची थंडी, दुपारी उन्हाचे चटके आणि सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह येणारा वादळी पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात हे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. आज धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज असून तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. निफाड येथे निचांकी १२.४ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

या अवकाळी संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर परिसरात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. मैंदर्गी भागात गारांचा पाऊस झाल्याने ज्वारीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेली कणसे भिजून खराब झाली आहेत.

लातूर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. लातूर, रेणापूर आणि चाकूर तालुक्यांत मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रेणापूर परिसरात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रेही उडून गेले आहेत. परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि पालम परिसरात दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने रब्बी पिकांची धूळधाण उडवली. आनंदवाडी, चाटोरी आणि नाव्हा यांसारख्या अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाने जोरदार बॅटिंग केली. नागपुरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता, तर यवतमाळमध्ये गारपीट झाल्याने रब्बी पिकांवर मोठे संकट आले आहे. शेतात साठवून ठेवलेला हरभरा, तूर आणि मूग यांसारखी कडधान्ये भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. फळबागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून आंब्याचा मोहोर गळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामानातील या लहरीपणामुळे केवळ शेतीच नाही, तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. कधी थंडी तर कधी कडक ऊन यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असून सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी या बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...