नागपूर | Nagpur
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. सरकार जाणूनबुजून विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाहीत तो अधिकार विधिमंडळाचे अध्यक्ष, सभापतींचा आहे असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते.
विजय वडेट्टीवारांचा आरोप
याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, १९८० मध्ये भाजपाचे १४ आमदार होते, १९८५ मध्ये १६ आमदार होते तेव्हाही विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. नियत नसेल तर त्याला काही बोलू शकत नाही. संविधानिक पद रिक्त ठेऊन तुम्ही कामकाज करताय हा मनमानी कारभार आहे. तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करायला काय दुखणे आहे, आम्ही नाव दिले आहे. जो काही असेल तो निर्णय घ्या. लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल तर त्यांना संविधानाप्रमाणे सरकार चालवायचे नाही असा अर्थ होतो. रेटून कारभार करत जनतेला न्याय द्यायचा नसेल. सरकारच्या गैरप्रकारावर कुणी अंकुश ठेवू नये असे वाटत असेल तर त्यांनी करू नये असा टोला त्यांनी लगावला.
भाजप सरकारमध्ये सौजन्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही-भास्कर जाधव
या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद मिळणार का, असा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. यावर शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट कायद्यात कुठेही नाही. भाजप सरकारमध्ये सौजन्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.
विधिमंडळाच्या कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट आहे, हे सरकारने दाखवावे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपकडे 10 टक्के सदस्य संख्या नसताना विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यामुळे भाजपला घेताना अटींची आठवण होत नाही, मात्र देताना त्यांना सर्व नियम आणि अटी लक्षात येतात, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
भास्कर जाधव म्हणाले की, भाजपकडे पाशवी बहुमत असूनही हे सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारच्या काळात अनेकदा विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे. एक नाही तर मी अनेक नावं सांगू शकतो. ज्यांच्याकडे 10 टक्के सदस्य संख्या नसताना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र भाजपला लोकशाहीच मान्य नाही, त्यामुळे ते लोकशाहीतील प्रथा आणि परंपरा पायदळी तुडवत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला
दरम्यान, भास्कर जाधव हे आक्रमक आहेत त्यामुळे त्यांची आक्रमकता पक्षावरच उलटू नये म्हणून जाधव यांच्या समाधानासाठी विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र देण्यात आले. त्यांचे समाधान करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु भास्कर जाधव यांनाच विरोधी पक्षनेते बनवतील का हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार सभापती, अध्यक्षांचा आहे. दोघेही निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी जाधवांना टोला लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




