नागपूर | Nagpur
सरकारचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये सरकार समोर जी आव्हाने आहेत त्या आव्हानांचा समर्थपणे सामना केला आहे. आम्ही महायुतीतले तिन्ही नेते एकत्रित निर्णय करतो आणि झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनातही दुःख होते पण आता निवडणुका सुरु झाल्याने आपली लोकशाही खालपर्यंत पोहचवण्यापर्यंत आणि लोकशाहीतल्या शेवटच्या संस्थेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि गतिमान होणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात नेमके काय म्हणाले?
हिवाळी अधिवेशन २०२५ च्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी दिले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महाराष्ट्र राज्य जे २०३० पर्यंत देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केला. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. तसेच, विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढत त्यांनी अनेक बाबी सभागृहात मांडल्या आहेत. तसेच, जाहीर केलेली किंवा सुरु असलेली कोणतीही योजना रद्द होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
व्हिजन डॉक्युमेंट २०४७ चा रोडमॅप सादर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट 2047’ चा रोडमॅप सादर केला. तसेच, निवडणुकांनंतरही ‘लाडकी बहीण’ सारखी कोणतीही योजना बंद होणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच, २०३० पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतानाच, आगामी काळातील विकासाचा रोडमॅपही मांडण्यात आला. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांचे महत्त्व आणि ‘अमृत महोत्सवी महाराष्ट्र’ या संकल्पनेवरही या भाषणात प्रकाश टाकण्यात आला आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे राज्याच्या हितासाठी काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. म्हणून मला सांगायचे आहे की अब आगे बढ चुकाँ हूँ मै, पिना था जितना जहर पिना पी चूँका हूँ मै, अब पग नहीं रुकनेवाले, आगे चल चुका हूँ मै, जितना पढना था तुमको पढ चुकाँ हूँ मै, अब आगे बढ चुका हूँ मै. असे मुख्यमंत्री म्हणाले.
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच
आपला महाराष्ट्र हे शक्तीशाली राज्य आहे. कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. १०६ हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहिल. आपले दैवत म्हणजे छत्रपती शिवराय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





