राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने 18 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि महोत्सव व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते होणार आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल व कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, राज्याचे कृषि आयुक्त सुरज मांढरे उपस्थित राहणार आहेत.
विविध पिकांचे 100 एकर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके, कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये ज्वारीचे 16 वाण, कडधान्य, तेलबिया व तृणधान्य पिकांचे 27 वाण, भाजीपाला पिकांचे 31 वाण, तसेच भरडधान्य, फळपिके, चारापिके, ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिके विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पहावयास मिळणार आहेत. विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान, कृषि निविष्ठा, ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन शेतकर्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
फुले कृषि महोत्सव-2026 हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असून प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील अशी माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी दिली.





