Saturday, April 11, 2026
HomeनगरSuicide News : विवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

Suicide News : विवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निमगाव जाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय 28) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची (Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात (Ashwi Police Station) पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत माधुरी हिचे लग्न 10 वर्षांपूर्वी निमगाव जाळी (Nimgaon Jali) येथील मनोज भास्कर अरगडे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर घरगुती कारणावरून पती मनोज आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांनी माधुरीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली जात असे. या त्रासाला कंटाळून डिसेंबर 2025 मध्ये माधुरी आपल्या दोन मुलांसह (शिवांश आणि विरांश) माहेरी अंभोरे येथे निघून आली होती. काही दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या मध्यस्थी आणि चर्चेनंतर तिला पुन्हा नांदण्यासाठी सासरी पाठवण्यात आले होते. मात्र, 7 फेब्रुवारी 2026 रोजी माधुरी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना दिली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही.

गुरुवारी (दि.12) दुपारच्या सुमारास औरंगपूर गावच्या शिवारातील एका शेततळ्यात माधुरीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सासरच्या सततच्या छळाला कंटाळूनच माधुरीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याबाबत तिचे वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आश्वी पोलिसांनी पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

भाडेतत्वावरील घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा...