राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे विद्यापीठात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले आहेत.
डॉ. पाटील यांनी कृषी क्षेत्रात ३३ वर्षांहून अधिक काळ सेवा केली होती. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सिर्कोट) येथे संचालक व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख पदावर काम केले होते. तसेच ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्रभारी कुलगुरू म्हणूनही कार्यरत होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. विद्यापीठाला नुकताच ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे, ज्यामागे डॉ. पाटील यांचे कुशल नेतृत्व होते. त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी कारकीर्द प्रगती योजना, १२/२४ आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तीवेतन यासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.
तसेच त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठात नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना मिळाली.डॉ. पाटील यांच्या नावावर ४ पुस्तके, १९९ संशोधनात्मक पेपर्स, १४ तांत्रिक शिक्षणावरील पुस्तके आणि १ पेटंट जमा आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते पारदर्शकता आणि योग्य निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात.