Sunday, May 5, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण गेले - दरेकर

महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण गेले – दरेकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

मराठा आरक्षणाचा विषय फडणवीस यांनी मार्गी लावला होता. मात्र महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले. मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांंसंदर्भात आमचे सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही यातून लवकरच मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया आ. प्रविण दरेकर यांनी दिली.

- Advertisement -

आ. प्रविण दरेकर यांनी रविवारी साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, सुधीर शिंदे, उपाध्यक्ष सुधीर शिंदे, भाजयुमोचे शहराध्यक्ष योगेश गोंदकर, लखन बेलदार, नरेश सुराणा आदीं उपस्थित होते. आ. दरेकर म्हणाले, संजय राऊत म्हणतात शिवसेना सोडणार नाही. त्यांना माझी विनंती आहे, आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना संपेल. तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाही आणि शिंदे गटात तुम्हाला जागा नाही.

भाजप एका वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे. या गोष्टींना भाजप थारा देत नाही. कोणाला वाटत असेल चौकशा सुरू आहे तर त्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत येऊ नये. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यामध्ये राऊतांचा हात असतांना त्यानी बाळासाहेबांची शप्पथ घ्यायची यापेक्षा नौटंकी राजकारण काय असू शकते असा सवालही आ.दरेकर यांनी उपस्थित केला.

राज्यात महाराष्ट्राचे हित जपणारे शिंदे फडणवीस सरकार आले आहे. विकासाचे प्रश्न अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत. सर्व समाजघटकांना न्याय मिळेल आणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल यासाठी शिंदे आणी फडणवीस यांना साईबाबांचे आशिर्वाद लाभावे अशी साईचरणी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या