Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीचा आज 'महाराष्ट्र बंद'

महाविकास आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’

मुंबई । प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांबाबत घडलेल्या हिंसाचाराची धग महाराष्ट्रात पोहोचली आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज (दि.11) ‘महाराष्ट्र बंद’ची साद घातली आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

व्यापार्‍यांनी मात्र बंदला विरोध दर्शवला आहे. करोना व टाळेबंदीनंतर दुकाने नुकतीच उघडली आहेत. आर्थिक घडी अजून बसलेली नाही. त्यामुळे बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय मुंबई-पुण्यातील व्यापार्‍यांनी घेतला आहे. काही ठिकाणी व्यापारी काळी फीत बांधून बंदला पाठिंबा देणार आहेत. बंदमध्ये तीनही पक्ष उतरल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह अनेक शहरांतील व्यवहार आज थंडावण्याची शक्यता आहे.

लखीमपूर खेरीतील हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला

‘महाराष्ट्र बंद’ पाळण्याचा निर्णयही महाविकास आघाडीने घेतला. आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ बाबत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. बंदमध्ये तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे आणि सोमवारचा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बोलून दाखवला.

लखीमपूर खेरीतील घटनेमुळे प्रत्येक नागरिकाच्या मनावर जखम झाली आहे, प्रत्येक जण हळहळत आहे. त्यामुळे बंद पुकारल्यानंतर राज्यातील जनता स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील, असाही दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले. आजच्या बंदवेळी काँग्रेसचे नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत, अशी माहिती पटोले यांनी दिली.

शहर-जिल्ह्यात बंदचे आवाहन

महाविकास आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. जनतेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी आज केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तिन्ही पक्षांची कार्यालये तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

बंद कडकडीत : मलिक

उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथील शेतकर्‍यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीने पुकारलेला उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ कडकडीत राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. बंदला जनतेची साथ मिळण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी जनतेला बंदमध्ये सामील होण्याची विनंती आज करतील. जनता ‘बंद’ला नक्कीच साथ देईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

आवाज दाबू नका : चव्हाण

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात देशातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपर्‍यात शेतकरी आंदोलने होत आहेत, पण केंद्र सरकार शेतकर्‍यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधकांचा आवाज दाबला जाणार असेल तर लोक ते कदापि सहन करणार नाहीत. याचा प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा इशारा काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या