अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व एका नगरपंचायतसाठी निवडणुकीची रणधुमाळी पेटलेली असून उमेदवारी दाखल करण्याचे पहिले दोन दिवस संपलेले आहेत. जिल्ह्यात अद्याप एकाही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. दुसरीकडे पालिका निवडणूका महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी होणार की स्थानिक आघाड्यांना ऊत येणार याबाबतचे पत्ते ओपन होत नसल्याने या निवडणुकीतील सस्पेन्स वाढला आहे.
सोमवार (दि.10) पासून नगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यात 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत आहे. यात शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस असून पहिले दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे उमेदवारी दाखल करण्याचे चार दिवस संपले असून आता आज बुधवार ते शुक्रवार 14 नाव्हेंबर असे तीन दिवस आणि सोमवारचा अखेरचा एक दिवस असे चार दिवस बाकी आहेत. यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाविक नगरसेवकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात पालिका निवडणुकीसाठी अद्याप राजकीय चित्र धुसर दिसत आहे. जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अधिक असतांना पालिका निवडणूकांमध्ये अद्याप महायुती म्हणून निवडणूक लढणार की याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यात होणार्या घडमोडीपेक्षा नगर जिल्ह्यात होणार्या राजकीय घडमोडी वेगळ्या असल्याने नगरच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.
स्थानिक आघाड्यांचे वर्चस्वाची शक्यता
दरम्यान, जिल्ह्यात महायुती किंवा महायुतीपेक्षा स्थानिक राजकीय परिस्थिती यावर बरेच समिकरण अवलंबून राहणार असल्याचे चित्र आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात पालिका निवडणुकीत स्थानिक आघाड्यांची राजकीय भूमिका आणि वर्चस्व राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




