मुंबई | Mumbai
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पक्षभरती सुरु केली आहे. त्यामुळे महायुतीत विशेषतः शिवसेना शिंदे गटात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परीणाम आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीवर दिसून आला. शिवसेना शिंदेगटाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे पहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रीमंडळ बैठकीच्या बहिष्कारानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांना भाजपमध्ये थेट प्रवेश दिला जातोय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थतता आहे. ती आज मंत्र्यांनी किती मोठ्या प्रमाणात आहे, ते दाखवून दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचे काम रविंद्र चव्हाण करत असल्याची तक्रार केली.
फडणवीसांनी सुनावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले. त्यांनी म्हटले की, “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्हीच केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे, आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. येथून पुढे एकमेकांच्या पक्षात प्रवेश देऊ नका. नियम दोन्ही बाजूंसाठी समान असतील, आणि पथ्य दोन्ही पक्षांनीच पाळायचे अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे गटाच्या नाराजीमागे भाजपची फोडाफोडी
शिंदे गटाच्या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





