सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत आपण महायुतीचा (Mahayuti) धर्म पाळत लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली. शहरातील जनसंपर्क कार्यालयात आज (दि.१२) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले. विकासकामांचा बॅकलॉग भरून काढणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. लोकांची आश्वासने पूर्ण करणे यासाठी सत्तेत राहणे आवश्यक असून यासाठीचअजित पवार यांच्यासोबत गेलो. विकास कामांव्यतिरिक्त कुठलीही अपेक्षा आजवर केली नाही. अजितदादांनीही तालुक्याच्या विकासासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली. हे केवळ सत्तेमुळेच शक्य झाले. मागील पंधरा वर्षात कधीही इतकी मोठी कामे तालुक्याला मंजूर झाली नव्हती. मात्र, अजितदादांची साथ दिल्याने तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे, असे कोकाटेंनी म्हटले.
पुढे बोलतांना कोकाटे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन आला आणि त्यांनी महाविकास आघाडीचे काम करण्याच्या सूचना मला केल्या. हेमंत गोडसे यांच्याबद्दल वैयक्तिक नाराजी असेल तर ती मुख्यमंत्र्यांची (CM)भेट घेऊन त्यांच्यासोबत बोला असे अजितदादांनी सांगितले. नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला विनंती करत आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सिन्नर तालुक्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासनही दिले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण आजपासूनच आघाडी धर्म पाळणार असून गोडसे यांचा प्रचार करणार असल्याचे कोकाटेंनी म्हटले.
तसेच यासाठी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या असून गावोगावी बैठका घेऊन कार्यकर्ते प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विकासकामांसाठी निधी देण्याचा शब्द दिल्यानेच गोडसे यांचा प्रचार करणार असल्याची माहिती यावेळी आमदार कोकाटे यांनी दिली. याशिवाय अजितदादांना साथ दिल्याने तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी मिळत आहे. यापुढेही अजितदादांची कधीही साथ सोडणार नसून ते सांगतील तीच दिशा मानून काम करणार असल्याचेही यावेळी आमदार कोकाटे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्तेही संभ्रमात होते. मात्र, आता तालुक्याच्या विकास कामांसाठी सर्व बाजूला ठेवत एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी कोकाटे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकाटेंचा मेळावा रद्द
आमदार कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी दोन-चार दिवसात मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र, कोकाटे यांनी मेळावा घेण्याऐवजी मोजके पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.