मुंबई । Mumbai
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या आलबेल नसल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत आणि गंभीर स्वरूपाची टीका केली आहे. या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीमधील दरी अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका जाहीर सभेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यांनी श्वेता महाले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट आव्हान दिले. “आमचे काम सरळ आहे, आम्ही छातीला छाती भिडवून विषय संपवतो; पाठीत खंजीर खुपसण्याचे धंदे आम्हाला जमत नाहीत,” अशा शब्दांत गायकवाड यांनी आपला संताप व्यक्त केला. चिखलीच्या आमदार श्वेता महाले या आपल्या नातेवाईकांना आणि कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार गायकवाड पुढे म्हणाले की, चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक आणि कार्यकर्ते आहेत. जेव्हा हे नातेवाईक माझ्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर एखादी पोस्ट टाकतात, तेव्हा आमदार महाले त्यांना धमक्या देतात. तसेच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एखादे काम सांगितल्यास त्यांना आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली जाते, असा दावाही गायकवाड यांनी केला. “आम्ही आतापर्यंत पाच-सहा वेळा भाजपच्या आमदाराला निवडून आणण्यासाठी मदत केली आहे, पण आता आमच्याच कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
या वादाचे मूळ माहिती अधिकार अर्जावरून सुरू झाल्याचे दिसते. आमदार श्वेता महाले यांनी गायकवाड यांच्यावर माहिती अधिकाराचा वापर करून सरपंचांवर दबाव आणल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना गायकवाड यांनी अत्यंत कडक शब्द वापरले. “मी माहिती अधिकारासारखे हि** धंदे कधीच करत नाही, अशा गोष्टी तुमच्या घरात चौकशी करा. मी घरात बसून राहणारा आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात माझे नाव आहे,” असे म्हणत त्यांनी महालेंच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
गायकवाड यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, ते चिखलीमध्ये विधानसभा लढवण्यासाठी आलेले नाहीत, तर आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि खासदारांना मिळालेली मते वाढवण्यासाठी आले आहेत. मात्र, जर कुणी शिवसेना चिरडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो त्रास दूर करण्यासाठी आपण खंबीर आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. “आम्ही पण आता पाहणार आहोत की, तुम्ही कोणाला जेलमध्ये टाकता आणि कोणाला धमक्या देता. आमदार काय काय करतात, हे आम्हालाही चांगलेच ठाऊक आहे,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी महालेंना थेट इशारा दिला आहे.
बुलढाण्यातील या दोन बड्या नेत्यांमधील वादामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांमधील हा कलगीतुरा वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या टीकेला आता आमदार श्वेता महाले काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





