मनमाड । प्रतिनिधी Manmad
अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामुळे नांदगाव बाजार समितीत कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता मनमाड बाजार समितीत समीर भुजबळ यांची एन्ट्री होताच मक्याच्या लिलावात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समीर भुजबळ यांनी समितीला भेट दिली. त्यावेळी तेथे मका लिलाव सुरू होता. भुजबळ यांनी मका लिलावात स्वतः सहभाग नोंदवला. त्यांची ही एन्ट्रीच मका दरावर परिणाम करणारी ठरली. लिलावात तेजी आल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले. मका सुपर असेल तर 2100 ते 2200 रुपये तर बी ग्रेड मक्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे त्यांना दिसून आले. मक्का उत्पादक शेतकरी योगेश दराडे, त्र्यंबक पवार, कृष्णा वाघ, ज्ञानेश्वर बोराडे, सुनील वाबळे, रवींद्र घाडगे, कारभारी कातकडे, बाळासाहेब आव्हाड, प्रवीण शिंदे, जनार्दन शिंदे, बाळू डोंगरे यांचा मका लिलाव सुरू होता.
शेतकरी भवन उभारणार
समीर भुजबळ म्हणाले की, शेतकर्यांसाठी भव्य शेतकरी भवन उभारले जाईल. नेहमीच शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल. वचननाम्यात मी पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा आपल्यासमोर सादर केला आहे. आता आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले.
जाणून घेतल्या समस्या
यावेळी भुजबळ यांनी बाजार समितीतील विविध समस्या जाणून घेतल्या. व्यापारी, शेतकरी, कर्मचारी आदींनी त्यांना माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती दीपक गोगड, संचालक योगेश कदम, आप्पा कुनगर, मधुकर उगले, सचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते. हमाल, मापारी यांनी त्यांच्या अडीअडचणी भुजबळ यांच्याकडे मांडल्या. वंजारवाडीचे शेतकरी मच्छिंद्र शिंदे म्हणाले की, स्वच्छ पाणी, शौचालय, शेतकरी निवास, चांगले रस्ते यांची बाजार समितीत नितांत गरज आहे.
अशी मंजुरी काय कामाची?
सभापती दीपक गोगड म्हणाले की, समितीतील सुविधांसाठी सव्वादोन लाखांचा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर मंजूर करण्यात आला. त्यात 24 अटी-शर्ती टाकण्यात आल्या. कामासाठी अडचणींचा डोंगर उभा करून मिळालेली मंजुरी काय कामाची?असा सवाल गोगड यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा