Friday, January 23, 2026
Homeनगरसुनीता भांगरे, दिलीप भांगरेंसह अनेकजण भाजपात; 'ऑपरेशन लोटस'ला अकोले तालुक्यातून सुरुवात

सुनीता भांगरे, दिलीप भांगरेंसह अनेकजण भाजपात; ‘ऑपरेशन लोटस’ला अकोले तालुक्यातून सुरुवात

अकोले (प्रतिनिधी)

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन लोटस’ला अकोले तालुक्यातून सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे व पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप भांगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि.२८) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात तालुक्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

सुनीता भांगरे यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष व विधानसभेची निवडणूक लढविलेले अमित भांगरे यांनी मात्र ‘जैसे थे’ राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुनीता भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे व दिलीप भांगरे यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथे दिवाळीच्या काळात भेट घेतली होती. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण समजली जात होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले होते.

YouTube video player

अखेर मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोलेतील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, भाजप प्रवक्ते नवनाथ बन, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, वाल्मिक नवले, तुकाराम खाडे, ‘अताएसो’चे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायक देशमुख यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याबद्दल स्वागत करून तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही आशी ग्वाही देवून ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. आपण आपल्या भागात चांगले काम करून पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री विखे पाटील म्हणाले, भांगरे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन करून अकोले तालुका संपूर्ण भाजपमय करण्यासाठी सर्वांचा पक्षप्रवेश महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून अकोले तालुका शतप्रतिशत भाजप करण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार पिचड यांनी मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारने झालेला पक्ष प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून तालुक्यातील सर्व गट आणि गणात भाजपचे उमेदवार विजयी करण्याचे त्यांनी आश्वासित केले.

दिवंगत ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी यापूर्वी माजी मंत्री स्वर्गीय मधुकर पिचड यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे, भांगरे कुटुंब आणि विखे परिवाराचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्ह्यावर सध्या मंत्री विखे यांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे सुनीता भांगरे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर त्या भाजपमध्ये परतल्या आहेत. दरम्यान, भांगरे आणि पिचड घराण्यामधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दिवंगत अशोक भांगरे यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका माजी मंत्री पिचड यांच्याविरुद्ध लढविल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पिचड-भांगरे हे राजकीय प्रतिस्पर्धी आता अनेक वर्षांनंतर अकोले तालुक्याच्या राजकारणात एकत्र दिसणार आहेत.

अकोलेचे माजी आमदार स्व. यशवंत भांगरे यांच्या स्नुषा असणाऱ्या सुनीता भांगरे, सुपुत्र दिलीप भांगरे व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे आमदार डॉ. किरण लहामटे यांची आगामी काळात डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धक्कातंत्राची सुरुवात ही अकोले तालुक्यातून केली असल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आगामी काळात जिल्ह्यातील अनेक मातब्बरांचे भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...