Friday, September 18, 2026
Homeक्राईमLoni : ममदापूरमध्ये गोवंशाची कत्तल; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Loni : ममदापूरमध्ये गोवंशाची कत्तल; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील ममदापूर गावात गोवंशाची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी कत्तल केलेले अंदाजे 600 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे आणि होंडा कंपनीची चारचाकी गाडी असा एकूण सुमारे 4 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेले दोघे अंधाराचा फायदा घेत काटवनातून पसार झाले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ममदापूर येथील रेहान महम्मद आयाज कुरेशी याच्या घरासमोरील रस्त्याच्या पलीकडे काटवनात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लोणी पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाण्याची तयारी केली. पोलीस पथक रात्री 11.44 वाजता लोणी पोलीस ठाण्यातून निघाले. 16 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ममदापूर येथे पोहोचल्यानंतर पायी घटनास्थळी जाऊन सुमारे 12.30 वाजता छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन इसम कत्तल करताना दिसून आले. मात्र पोलीस आणि पंचांची चाहूल लागताच रेहान महम्मद आयाज कुरेशी आणि मुद्दसर कुरेशी, दोघेही रा. ममदापूर, ता. राहाता, हे अंधाराचा फायदा घेत काटवनातून पसार झाले.

घटनास्थळाची पंचांसमक्ष पाहणी केली असता तेथे गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस, मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेली एक कुर्‍हाड, दोन सुरे आणि एक कोयता, तसेच एमएच-43 ए-8847 क्रमांकाची होंडा कंपनीची चारचाकी गाडी आढळून आली. पोलिसांनी अंदाजे 600 किलो गोमांसाची किंमत 1 लाख 20 हजार रुपये, चारचाकी वाहनाची किंमत सुमारे 3 लाख 50 हजार रुपये तर कत्तलीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. गोमांस नाशवंत असल्याने पंचांसमक्ष त्याचे नमुने डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने जाड मिठामध्ये प्लास्टिकच्या बरणीत ठेवून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जागेवरच सील केले. उर्वरित गोमांस पंचांसमक्ष जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी रेहान महम्मद आयाज कुरेशी आणि मुद्दसर कुरेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. अविनाश मकासरे करीत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरपंचच ग्रामपंचायतींवर प्रशासक हवेत; न्यायालयात याचिका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचाचीच पुन्हा नियुक्ती करावी, या मागणीसाठी सरपंच परिषदेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे...