
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
कोकण विभागातील अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सुमारे २०९ कोटी रुपयांची मदत आणि हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कोकणातील आंबाआणि काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या निलेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भरणे म्हणाले, कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे मदत देण्यात येणार असून, कोकण विभागासाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही मदत लवकरच वितरित केली जाईल.
यावेळी कृषी मंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जिल्हानिहाय मदतीचा तपशील जाहीर केला. ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ६६९ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८४ लाख रुपये, पालघरमधील १७ हजार ७१२ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ८३ लाख रुपये, रायगडमधील सुमारे १७ हजार शेतकऱ्यांसाठी २० कोटी २८ लाख रुपये, रत्नागिरीतील ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ४५ लाख रुपये तर सिंधुदुर्गमधील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.
याशिवाय, हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार असून, एनडीआरएफची मदत आणि पीक विम्याची रक्कम पुढील १५ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.




