Monday, August 17, 2026
HomeनगरRahuri : आंबा पिकावर लीफ मायनरचा प्रादूर्भाव वाढला

Rahuri : आंबा पिकावर लीफ मायनरचा प्रादूर्भाव वाढला

राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिला सल्ला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्रातील आंबा पट्ट्यात गेल्या काही दिवसांत लीफ मायनर या कीडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. काजू पिकाची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाणारी ही कीड आता आंबा पिकावरही नुकसानकारक ठरत असल्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. बदलत्या हवामानामुळे विविध किडींच्या वर्तनात आणि यजमान पिकांच्या निवडीत होणारे बदल हा या नव्या परिस्थितीचा मुख्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळा आणि नंतरच्या दमट हवामानामुळे आंब्याच्या कोवळ्या पानांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाला अहमदनगर, सोलापूर तसेच पुणे व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून या किडीचे नमुने प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

या अळीच्या नियंत्रणासाठी राहुरी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख तथा हॉर्टसॅप योजनेचे प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे, संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे आणि कीटकशास्त्र विभागातील डॉ. सखाराम आघाव यांनी शेतकर्‍यांना पुढील उपाय तातडीने राबवण्याचे आवाहन केले आहे. प्रादुर्भावग्रस्त कोवळी पाने व अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडीची कोष अवस्था जमिनीत असल्यामुळे खाली पडलेला पालापाचोळा साफ करून जमिनीची मशागत करावी, जेणेकरून कोष बाहेर येऊन उन्हामुळे नष्ट होतील.

चिलोनस प्रजाती, सिम्पायसिस प्रजाती, क्रायसोचारिस नेफेरियस, ग्रीन लेसविंग यांसारख्या मित्रकिटकांचे संवर्धन करावे. नियमित निरीक्षण ठेवून प्रादुर्भाव प्रारंभीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. लीफ मायनर ही कीड आंबा पिकावर दुय्यम मानली जात असली तरी सध्या हवामानातील बदलामुळे तिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी वेळेवर निरीक्षण व योग्य व्यवस्थापन उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असे विद्यापीठातील तज्ज्ञांनी आवाहन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...