नाशिक | Nashik
राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरील एका खटल्यात दोन वर्षांचा करावास ठोठावण्यात आला आहे. १९९५ सालचे हे प्रकरण असून कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपदासह आमदारकीही जाण्याची शक्यता आहे. यावर कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांची प्रतिक्रिया आली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. हे राजकीय प्रकरण होते. त्यांचे आणि माझे वैर होते, त्या वैरातूनच त्यांनी माझ्यावर केस केली होती. या केसचा निकाल आज ३० वर्षांनी लागला आहे. माझ्या राजीनाम्याचीही मागणी होऊ शकते, या संदर्भात मी हायकोर्टात जाणार असल्याचे, कोकाटे यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, हा खटला 1995 चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशिर झाला असला तरी आज निकाल लागला आहे. आता मी वरच्या कोर्टात आपील करणार आहेत. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही. न्याय मागण्याचा अधिकार नागरिक म्हणून मला आहे. हे प्रकरण ३० वर्षांपूर्वीचे आहे, तेव्हा मी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता. मी आमदार होतो की नाही ते देखील मला माहिती नाही. तो काळ आणि आजचा काळामध्ये फरक आहे, असे कोकाटे यांनी म्हटले. याचबरोबर नंतरच्या काळात दिघोळे आणि माझे चांगले संबंध तयार झाले होते. सलोख्याचे संबंध होते, असे स्पष्ट करताना कोकाटे यांनी आपण रितसर जामीन घेतला असल्याचे स्पष्ट केले.
नेमके प्रकरण काय आहे?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. कोर्टाने ३० वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता. जवळपास तीन दशक या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखरे आज कोर्टाने आपला निकाल सुनावताना माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी शिक्षा सुनावली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा