नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या दीड वर्षापासून मैतेई आणि कुकी समुदाय यांच्यातील तणाव पराकोटीला गेल्यामुळे मणिपूरमध्ये (Manipur) हिंसाचार सुरु असलेला पाहायला मिळत होता. त्यामुळे विरोधकांकडून तेथील मुख्यमंत्र्यांचा (Chief Minister) राजीनामा (Resignation) मागितला जात होता. अखेर आज संध्याकाळी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
एन बिरेन सिंह (N Biren Singh) काही वेळापूर्वी भाजप खासदार संबित पात्रा, राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांसह राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. त्याआधी सिंह यांनी आजच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्यांनी भेट घेतली होती. या भेटीनतंर एन बिरेन सिंह यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर गृहमंत्रालयाने सगळ्या सुरक्षा दलांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान,एन बिरेन सिंह यांच्याबाबत भाजप आमदारांमध्ये (BJP MLA) दीर्घकाळपासून नाराजी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मणिपूरमधील भाजपच्या १९ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्या पत्रात सही करणाऱ्या आमदारांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यव्रत सिंह, मंत्री थोंगम विश्वजीत सिंह आणि युमनाम खेमचंद सिंह यांचा समावेश होता.
राजीनामा दिल्यानंतर बिरेन सिंह काय म्हणाले?
भाजप नेते बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”लोकांची सेवा करणे, हाच माझ्यासाठी सन्मान आहे. मी केंद्र सरकारचा आभारी आहे. त्यांनी वेळेत कारवाई केली. राज्याच्या मदतीसाठी विकासासाठी काम केले. मणिपूरमधील जनतेच्या हितासाठी अनेक योजना देखील राबवल्या. मी केंद्र सरकारला विनंती करतो की, अशाच प्रकारे काम सुरु ठेवावे”, असे त्यांनी म्हटले आहे.