बीड | Beed
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
मनोज जरांगे हत्येच्या कट प्रकरणी गेवराईच्या अमोल खुणे याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीने धक्कादायक खुलासे केले. तिने पती निर्दोष असल्याचे सांगितले आहे. माझ्या पतीला या प्रकरणात फसवल्याचा पत्नीचा दावा आहे. त्यानंतर आता या घटनेतील दुसऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे.
मनोज जरांगे प्रकरणात अटकेत असलेला संशयित दादा गरुडचा धनंजय मुंडेंसोबत भेट झाली, या कबुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. परळीतील शासकीय विश्रामगृहात भेट झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा होता, जरांगे पाटील यांच्या दाव्यानंतर आता कबुली देतानाचा दादा गरुडचा व्हिडीओ समोर आला आहे. शासकीय विश्रामगृहात परळीतील जण होते, अमोल खुणे, कांचन मुंडे आणि धनंजय मुंडे हे २५ मिनिटे दुसऱ्या खोलीत बसले होते, असा दावा दादा गरुड याने या व्हिडीओमध्ये केला आहे. मी तीथे दुसऱ्या कामासाठी गेलो होतो असेही तो या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी आता आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणात पोलीस आणखी काय कारवाई करतात, हे पाहावे लागले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप अमोल खुणे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याचा रहिवासी आहे, पोलिसांकडून या प्रकरणात त्याच्या घराची देखील तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान अमोल खुणे याच्या बायकोने आपल्या पतीवरील आरोप फेटाळले आहेत. त्यांना या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा दावा तिने केला आहे. दारू पाजून त्यांना फसवण्यात आले, माझे पती मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एक अपशब्द सुद्ध सहन करू शकत नाहीत, असे अमोल खुणे याच्या पत्नीने म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




