जालना | Jalana
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा बॉम्ब फोडला आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. त्यात मनोज जरांगेंच्या विरोधात भाजपकडून कसे षडयंत्र रचले जातेय हे स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. मनोज जरांगे हे फडणवीस आणि भाजपला कसे टार्गेट करतील ते पाहा. कारण विधानसभेत आपल्याला त्याचा फायदाच होईल. जरांगे हे निवडणुकीतील आपले थर्ड फ्रंट असतील, असा प्लानच या क्लिपमध्ये चार पाच लोक रचताना दिसत आहेत. यात एक महिलाही आहे. जरांगे यांनी ही क्लिप ऐकवल्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपची देशदूत पुष्टी करत नाहीये.
मनोज जरांगे पाटील यांचे ५०० कोटींचे आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ‘ऑडिओ क्लिप’चा बॉम्ब फोडला. या पत्रकार परिषदेत त्यांनी एका बैठकीतील कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. साधारण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माझ्याविरोधात काय षडयंत्र रचले जात होते, हे ऐका असे म्हणत जरांगे पाटील यांनी स्फोटक ऑडिओ क्लिप ऐकवली.
ऑडिओ क्लिपमध्ये काय?
जरांगे पाटील यांना ५०० कोटी रूपये पोहोचले आहेत. एका नेत्यामार्फत हे पैसे दिले आहेत. आता जरांगे पाटील विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील किंवा नाही राहणार याबाबत माझे मत वेगळे आहे. त्यामागची गणितेही वेगळे आहे, असे ऑडिओ क्लिपमधील महिला म्हणत असल्याचे ऐकू येते.
तसेच जरांगे पाटील आणि काही व्यक्ती विकासाच्या विरोधी असल्याचा प्रचार आपल्याला करावा लागेल, त्यासाठी दररोज समाज माध्यमांवर काही पोस्ट कराव्या लागतील, असेही एक व्यक्ती ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत असल्याचे ऐकू येते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नेते पुढे करून जरांगेंचा प्रभाव कसा कमी करायचा? त्यासाठी वैयक्तिक स्तरावर फंड कसा उभारायचा? हे या संभाषणातून ऐकायला मिळत आहे.
“जरांगे भाजपला मराठाद्रोही ठरवत आहेत आणि त्याचा प्रभाव समाजात पडत आहे. प्रवीण दरेकर किंवा नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांचे बोलणे बाजूला ठेवू. पण, शिवेंद्रराजे भोसले यांचा व्हिडिओ केला. तसाच, मुद्दा पुढे करून खासदार उदयनराजे भोसले किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना बोलते केले पाहिजे. भाजपमधील मराठा चेहऱ्यांनी समोर येऊन जरांगेंना उत्तर दिले पाहिजे.” असे यामध्ये म्हटले गेले आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके कोण आहेत? हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. जर त्यांनी याचा छडा लावला नाही तर यात त्यांचा हात आहे, असे मी समजेन, असेही जरांगे पाटील म्हणाले. ५०० कोटी कुणी कुणाला दिले, हे शोधले पाहिजे, हे षडयंत्र कुणी रचले, हे देखील समोर आले पाहिजे. माझ्याविरोधात षडयंत्र कुणी रचले, हे महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. मराठा समाजाने सावध राहावे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंनी नेमका काय आरोप केलाय?
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत..जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.




