
जालना | Jalna
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे येण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाने हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करावे, असे स्पष्ट आदेश जरांगे पाटील यांनी दिले आहेत. जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना गनिमी कावा वापरण्यास सांगितला आहे. या आंदोलनासाठी मुंबईत राहणाऱ्या नातेवाईक आणि पाहुण्यांचा शोध घेऊन राहण्याची सोय करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला जा
मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले, “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख संख्या होईल” असे जरांगे पाटील यांनी सांगितले. “12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14, 15, 16, 17, 20, 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत परवानगी काढा. मुंबईत पाहुणे, मित्रमंडळींकडे रहा. आझाद मैदान, वर्षावर जाऊ नका” संशय येईल, पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला (Police Station) जा, उलट तिथे चांगली सोय होते. उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो, अशी घोषणा त्यांनी केलीय.
एकनाथ शिंदे, फडणवीसांकडे बघायचय
जरांगे पुढे म्हणाले, “पुढे जाताना गाडीला झेंडा बांधून जाऊ नका. झेंडा बांधून जायचं नाही. हळूहळू घुसा, दोन-चार दिवस आधी. पाच-सहा तारखेपासून हळूहळू पुढे जा. सगळ्यांनी माझ्यासोबत येऊ नका. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. एकनाथ शिंदे, फडणवीसांकडे बघायचय आपल्याला. पोलिसांना त्रास द्यायचा नाहीय. उगाच टाइमपास करु नका. दोन-चार दिवस आधी मुंबईकडे निघा” असे आवाहन जरांगे पाटील यांनी समर्थकांना केले.
ते आम्हाला देव-देव शिकवतात
गणेशोत्सव आपला आहे, आम्ही 11 दिवस गणपती बसवतो ते दीड दिवस बसवतात आणि ते आम्हाला देव-देव शिकवतात, आमच्या एवढं पुण्य कोण करतं,” असे देखील त्यांनी म्हटले. मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्यावर आणि सरकारच्या संपर्कावर प्रतिक्रिया देताना जरांगे पुढे म्हणाले, “24 तासात संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का, हळूहळू सरी पडणार. पोराहो आपले मुंबईचे सुरू करा,” असे त्यांनी म्हटले.




