जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यभर संवाद साधण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या ७ डिसेंबर २०२६ पासून त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होणार असून, या माध्यमातून ते राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेट देणार आहेत. हा दौरा ४ ते ५ टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना एकत्र बोलावून कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रे मिळवताना येणाऱ्या अडचणी आणि आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या दौऱ्याचे सविस्तर नियोजन १ डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
“सात डिसेंबरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल, तसेच कुणबी प्रमाणपत्राबाबत अडी अडचणी जाणून घेण्यासाठी दौरे करणार आहे. यामध्ये सभा, बैठका नसतील. ठिकाण आपण १ डिसेंबपासून जाहीर केले जाईल आणि ठिकाण त्या त्या जिल्ह्यातील बांधव ठरवतील. त्यामध्ये काही टप्पे पाडता येतील. ७ दिवसांचा टप्पा, आठ दिवसांचा १२ दिवसांचा टप्पा असे टप्पे पाडूया,” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
युट्युबर ध्रुव राठी यांच्या अडचणीत वाढ? न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार
ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही. यासह प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या विविध अडचणी जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जाणून घेणार आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी मराठा बांधवांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून मांडाव्यात, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.



