नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) नामांकित क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आणि गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मूळ सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याचा महत्त्वपूर्ण विषय आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या दोन्ही विषयांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. मंगळवारी (दि.२४) दुपारी २ वाजता नाशिक (Nashik) येथील संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
संस्थेच्या (Sanstha) आगामी वाटचालीच्या दृष्टीने ही विशेष सर्वसाधारण सभा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून, या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संस्थेच्या घटनेत बदल करण्याच्या अनुषंगाने घटना समितीने सादर केलेल्या मसुद्यावर या सभेत चर्चा होणार आहे. विशेषतः संचालक मंडळातील सदस्यसंख्या कमी करण्याचा प्रस्ताव सभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. गत सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या कमी करण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक सभासदांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली होती. त्यानंतर या विषयाचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने सभासदांची मते जाणून घेत विविध बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल संचालक मंडळाकडे सादर केला. या अहवालात संचालक मंडळाने काही दुरुस्त्या केल्याची चर्चा असून, सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळविण्यासाठी ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन निवडणुकांपासून संस्थेच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मूळ सभासदांच्या वारसांना सभासदत्व बहाल करण्याच्या मुद्द्यावरही या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सभेतील निर्णयाकडे सभासदांचे विशेष लक्ष लागले आहे.
संचालक मंडळाची (Board of Directors) संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आणि वारसा सभासदत्वाचा मुद्दा हे दोन्ही विषय संस्थेच्या भविष्यातील कारभारावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे या सभेत कोणत्या प्रस्तावांना मंजुरी मिळते आणि कोणते निर्णय घेतले जातात, याबाबत संस्थेच्या सभासदांसह जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभासदांसाठी संस्थेची नियमावली
विशेष सर्वसाधारण सभेसाठी संस्थेने सभासदांना काही नियम व सूचना लागू केल्या आहेत. सभेला केवळ अधिकृत सभासदांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशाच्या वेळी ओळख पडताळणीसाठी निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट किंवा अन्य कोणतेही वैध शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. घटना दुरुस्ती किंवा सभेतील अन्य विषयांबाबत सभासदांच्या सूचना अथवा हरकती लेखी स्वरूपात सभेच्या तीन दिवस अगोदरच मागविण्यात आल्या होत्या. तसेच सर्व सभासदांना वैयक्तिकरीत्या मसुदा पाठविणे नियमानुसार शक्य नसल्याने, इच्छुक सभासदांना संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात मसुदा पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. निर्धारित वेळेत सभेचा आवश्यक कोरम पूर्ण न झाल्यास अर्ध्या तासानंतर सभेच्या दिवशी व त्याच ठिकाणी सभा सुरू करण्यात येईल, असे संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी स्पष्ट केले आहे.
संस्थेच्या भविष्यातील प्रशासकीय रचनेत बदल घडविणारे आणि सभासदत्वाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला दिशा देणारे निर्णय या विशेष सभेत होण्याची शक्यता असल्याने, २४ नोव्हेंबरच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संस्थेचे सात हजाराहून अधिक सभासद असून ते मतदानापुरतेच जातीने हजर राहतात. मात्र, महत्त्वपूर्ण असलेल्या सर्वसाधारण सभेला अवघे ५०० ते ६०० सभासदच उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजच्या विशेष सर्वसाधारण सभेला तरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार का? अन्यथा अशा अनुपस्थित राहणाऱ्या निष्क्रिय सभासदांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी दत्तू बोडके यांनी केली आहे.



