Monday, November 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनेपाळशिवाय प्रभू राम अपुर्ण; PM मोदींचे उद्गार, २४ हजार कोटींच पॅकेज अन्...

नेपाळशिवाय प्रभू राम अपुर्ण; PM मोदींचे उद्गार, २४ हजार कोटींच पॅकेज अन् अयोध्या-जनकपूर रेल्वेचं उद्धाटन

नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड सोमवारी (२३ नोव्हेंबर) घडली आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे (NPR) विकास सहकार्य पॅकेज जाहीर केले. ऑगस्ट महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी ही मदत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, भारत दौऱ्यापूर्वी नेपाळकडून सुमारे २ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास १८ हजार कोटी भारतीय रुपयांच्या आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यात सवलतीच्या दरातील कर्ज, अनुदान आणि पूरग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी निधीचा समावेश होता. त्यानंतर मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजचे मूल्य १.६२ अब्ज डॉलर आहे.

सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात बालेन शाह यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले. “मी गौतम बुद्धांच्या जन्मभूमीतून आलो आहे. सत्याची शक्ती जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी असते,” असे भावपूर्ण उद्गार बालेन शाह यांनी यावेळी काढले. द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना त्रिवेणी संगमाचे पवित्र गंगाजल भेट दिले, तर शाह यांनी पंतप्रधान मोदींना पशुपतिनाथ मंदिरातील रुद्राक्ष आणि चंदन भेट म्हणून दिले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले, “नेपाळशिवाय आपली रामयात्रा अपूर्ण आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि नेपाळचे संबंध सामायिक इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंधांमध्ये रुजलेले आहेत. भगवान राम आणि माता सीता हे दोन्ही देशांच्या सामायिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. आपल्या २०१८ च्या जनकपूर दौऱ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, नेपाळशिवाय भारतातील तीर्थक्षेत्रे अपूर्ण आहेत आणि आपली रामयात्राही नेपाळशिवाय अपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सरयू-कमला एक्सप्रेस रेल्वे सेवेच्या शुभारंभाने दोन्ही देशांमधील या पवित्र संबंधांना एक नवीन दिशा मिळत आहे.

#WATCH | Delhi | PM Narendra Modi and Nepali PM Balendra Shah jointly flag off the Saryu-Kamala Express, a new weekly train service between Ayodhya Cantt in Uttar Pradesh and Janakpur Dham in Nepal

(Video source: DD) https://t.co/dmbEtEBr9i— ANI (@ANI) November 23, 2026

भारत-नेपाळ संबंध हे सामायिक इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर आधारित आहेत. भगवान राम आणि माता सीता हे दोन्ही देशांच्या सामायिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. या रेल्वेमुळे अयोध्येला येणाऱ्या भाविकांना नेपाळमधील जनकपूर धामला जाणे सोपे होईल आणि माता सीतेचे दर्शन घेणेही सोयीचे होईल.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, भारतासोबतच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत दोन्ही देशांमधील शतकानुशतके जुने संबंध अधिक दृढ करण्यावर आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे करार झाले, तसेच अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली. बालेन शाह म्हणाले की, या करारांचा आणि प्रकल्पांचा लाभ शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यामुळे रोजगार, नवीन बाजारपेठा, गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी वाढतील. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, या यशामुळे भारत-नेपाळ संबंध नव्या उंचीवर पोहोचतील.

अयोध्या-जनकपूर रेल्वे सेवेला हिरवा झेंडा
मोदी आणि बालेन शाह यांच्या भेटीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे अयोध्या आणि जनकपूर यांना जोडणाऱ्या ‘सरयू-कमला एक्स्प्रेस’ या रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या रेल्वेमुळे भारतातील अयोध्या धाम आणि नेपाळमधील जनकपूर धाम यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. धार्मिक पर्यटन, भाविकांची ये-जा आणि दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांना यामुळे चालना मिळेल, असे मोदी यांनी सांगितले. याशिवाय, भारतातील बोधगया आणि नेपाळमधील लुंबिनी यांसारख्या बौद्ध तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी संपर्कव्यवस्था सुधारण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला.

अयोध्या कँट ते जनकपूर धाम दरम्यानचे सुमारे ६०४ किलोमीटरचे अंतर ही एक्सप्रेस १८ तासांत पूर्ण करेल. विशेष म्हणजे, प्रवाशांना मार्गात कुठेही गाडी बदलण्याची गरज भासणार नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील १० प्रमुख स्थानकांवरून ही गाडी धावेल. यामध्ये अयोध्या धाम, मनकापूर, बस्ती, गोरखपूर, नरकटियागंज, रक्सौल, सीतामढी, शीशो (दरभंगा), मधुबनी आणि जयनगर या स्थानकांचा समावेश आहे. भारतातील जयनगर हे या गाडीचे शेवटचे स्थानक असेल, त्यानंतर ही ट्रेन नेपाळमधील जनकपूर धाम येथे पोहोचेल.

भारत – नेपाळमधील प्रमुख करार आणि घोषणा:
१. २४ हजार कोटींचे विकास पॅकेज: नेपाळमधील महापुरानंतरच्या पुनर्बांधणी आणि पायाभूत सुविधांसाठी भारताकडून २४,००० कोटी नेपाळी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
२. कांडला आणि पारादीप बंदरांचा वापर: नेपाळचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ व्हावा, यासाठी भारत नेपाळला गुजरातमधील कांडला आणि ओडिशातील पारादीप या बंदरांपर्यंत प्रवेश देणार आहे.
३. ऊर्जा आणि पाइपलाइन प्रकल्प: मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलियम पाइपलाइनच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आणि झापा पेट्रोलियम टर्मिनलचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशला नेपाळशी जोडणारे रस्ते व रेल्वे प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण केले जातील.
४. अंतराळ आणि आरोग्य करार: भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ (ISRO) आणि नेपाळचे दळणवळण मंत्रालय यांच्यात महत्त्वाचा करार झाला आहे. याशिवाय आरोग्य, औषधनिर्माण आणि आयुर्वेद क्षेत्रात सहकार्यासाठी दोन्ही देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजपचा नवा शहराध्यक्ष कोण? इच्छुकांची फिल्डिंग सुरू,...

0
नाशिक | Nashik भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या राजीनाम्याभोवती रंगलेले राजकीय नाट्य अद्याप शमलेले नाही. केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रदेश नेतृत्वाने...